आळंदीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही

0

आळंदी । आळंदी विकासात भ्रष्टाचार, कामात हयगय व दर्जात तडजोड होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल. आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. हे डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाला व ठेकेदारांना तंबी देत श्री क्षेत्र आळंदीच्या विकासास निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली.

महाराष्ट्र शासन नियोजन विकास विभागांतर्गत तीर्थक्षेत्र आळंदी परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, जलशुद्धीकरण केंद्रासह रस्त्यांचे लोकार्पण, घरकुल योजनेच्या अर्जांचे वाटप पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रसिकलाल धारिवाल सभागृहात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार बाळा भेगडे, महेश लांडगे, खेडचे प्रांत आयुष प्रसाद, तहसीलदार सुनील जोशी, ज्ञानेश्‍वर कारकर, अतुल देशमुख, आशिष जोशी, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, सागर भोसले, समीर भूमकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातील तसेच इतर विविध उपलब्ध निधीतील सुमारे 35 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ झाल्याचे पालकमंत्री बापट यांनी बोलताना सांगितले. राज्य नियोजन विकास विभाग अंतर्गत दिघी ते आळंदी रस्त्याचे सहा पदरीकरण तसेच अस्तित्वातील रस्त्याचे विस्तारीकरण व मजबुतीकरण, आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाचा विकास, इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान सेतूच्या मजबुतीकरणाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.

विकासकामांना गती मिळावी आळंदीत विलंबाने होत असलेल्या विकास प्रश्‍नी नगराध्यक्षा उमरगेकर यांनी बापट यांच्याशी चर्चा केली. राज्यातील भाविकांसह आळंदीतील नागरिकांसाठी विविध विकास कामे तात्काळ मार्गी लावली जावीत, कामांना गती मिळावी तसेच आळंदीला भामा आसखेडचे पाणी लवकर मिळावे यासाठी सहकार्य करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पालकमंत्री गिरीश बापट शुक्रवारी आळंदीच्या दौर्‍यावर होते. दौर्‍याप्रसंगी स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दांडी मारल्याचे दिसून आले.

नागरिक व भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा
आळंदी नगरपरिषद हद्दीतील नागरिक, भाविकांसाठी राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकसीत करण्यात येत असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यामुळे आळंदीतील नागरिक व भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले. आळंदीसह पुणे व पिंपरी चिंचवडला भामा आसखेड मधील पाणी बंद नलिकेद्वारे पुरवठा करण्याचे कामास गती देण्यात आली आहे. बाधित शेतकर्‍यांवर अन्याय होऊ न देता पाणी पुरवठ्याच्या नलिकांचे काम मार्गी लावण्यात येत आहे. यात शेतकर्‍यांचे पुनर्वसन, आर्थिक मोबदला, भूसंपादन आदी प्रश्‍न सोडविण्यास वेळ लागत असला तरी विकास कामातील अडथळे दूर करून अधिकचा विकास साधला जाणार असल्याचे बापट यांनी सांगितले.