पुण्यातील बाल सुधारगृहात झाली रवानगी
आळंदी : येथील प्रदक्षिणा मार्गावर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या वहिले आळीतील गणेश अॅण्ड समीक्षा मोबाईल शॉपी या दुकानाचा वरचा पत्रा उचकटून 43 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविणार्या बालगुन्हेगारास आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पुण्यातील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्रीच्या सुमारास घडली होती. आळंदी पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून तपास करत बालगुन्हेगारास पकडले.
‘सीसीटीव्ही’ची झाली मदत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ नारायण वहिले (वय 30, रा. मरकळ रस्ता, आळंदी) यांच्या मालकीचे वहिले आळीत गणेश अॅण्ड समीक्षा मोबाईल शॉपी हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या बालगुन्हेगाराने या दुकानाचा वरचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत नवे मोबाईल, सात हजार 600 रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला होता. शनिवारी सकाळी ही घटना उजेडात आली होती. त्यानंतर वहिले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी घटनेचा तपास करताना दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात चोरटा कैद झाला होता. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. त्याची रवानगी पुण्यातील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.