आळंदीत उसळला वैष्णवांचा महासागर

0

आळंदी । संत सम्राट ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या 722 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी शुक्रवारी (दि.14) साजरी होणार आहे. त्यासाठी अलंकापुरी सज्ज झाली आहे. लाखो वारकर्‍यांच्या साक्षीने ज्ञानोबा माउली नाम जय घोषात हा सोहळा साजरा होणार आहे.श्रींच्या संजीवन समाधी सोहळ्यांतर्गत कार्तिकी यात्रा कालावधीतील विविध धार्मिक कार्यक्रमात सोमवारी (दि.13) श्रींना अभिषेक, दुधारती, महापूजा, महानैवेद्य झाल्यानंतर ह. भ. प. गंगूकाका शिरवळकर आणि ह. भ. प. धोंडोपंतदादा अत्रे यांच्या वतीने कीर्तन सेवा झाली. धुपारतीनंतर ह. भ. प. वासकर महाराज आणि ह. भ. प. वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे कीर्तन सेवा हरीनाम गजरात झाली. यात्रेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा माउली मंदिरात सुरू आहे. टाळ, विणा, मृदुंगाचा त्रिनाद करीत हरिनामाचा गजर अलंकापुरीत दिवसभर दुमदुमला होता. भाविकांच्या गर्दीने तीर्थक्षेत्र फुलून गेले आहे.

प्रलंबित विकासावर मौन
यात्रा काळात प्रभावी सुविधा देण्यास पुणे जिल्हा प्रशासन कमी पडल्याने तीर्थक्षेत्रातील विकासाची शोकांतिका राज्यातील भाविकांसमोर उघड झाली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीस मोठे यात्रा अनुदान व तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना आळंदीच्या विकास खुंटला आहे. मात्र यावर वारकर्‍यांचे प्रतिनिधी, वारकरी पुढारी, वारकरी संघटना गप्पा का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यांच्या दुरवस्थेने आळंदीत धुळीचे साम्राज्याने भाविकांत नाराजीचा सूर असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर यांनी व्यक्त केली.

सुरक्षेसाठी प्रभावी नियोजन
नागरिक, भाविकांसह मंदिराच्या सुरक्षेसाठी प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नियोजनपूर्व बैठकीत मागणीप्रमाणे अधिकचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आळंदी देवस्थान कमिटी, पुणे जिल्हा पोलिस, महसुल, वीज वितरण, आरोग्य सेवा, पालिका प्रशासन यांची मदत घेण्यात आली. यात्रा नियोजनात समन्वय साधून भाविकांची फारसी गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.

यावर्षी नवीन दर्शनबारीसह आरक्षित जागेत देखील सुमारे 20 हजार भाविकांना दर्शनास येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्रींच्या दर्शनाची बारी आराधना हॉटेलच्या पुढे गेल्याने रस्त्याच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. भाविकांची पायवाट बिकट झाली. अनवाणी पायाने आलेल्या भाविकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भाविकांनी धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी फवारण्याची मागणी केली.

मंदिर परिसरात सीसीटीव्हीचा वॉच
यात्रा नियोजनातील सूचनांप्रमाणे भाविक, वारकरी, नागरिक, तीर्थयात्री यांच्या सेवेसाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक व सर्व विश्‍वस्त आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. माउली मंदिरासह इंद्रायणी नदी घाटावरील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. आळंदी देवस्थानचे वतीने भाविकांसाठी दर्शनबारी, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, अचानक पावसाची शक्यता गृहीत धरून पावसापासून सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या. मंदिर परिसरात सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला आहे. रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

अशी आहे व्यवस्था
पहाट पुजेसाठी हनुमान दरवाजाने त्यानंतर भाविकांना दर्शनबारीतून पास धारकाना हरिहरेंद्र स्वामी मठ समोरील देवस्थानच्या जिन्यातून मंदिरात दर्शनास प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांना श्रीच्या दर्शनानंतर मुख्य महाद्वारातून बाहेर सोडण्याचे नियोजन झाले आहे. मंदिरासह आळंदीत भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नवीन दर्शन बारीसह पूर्वीप्रमाणे पाणदरवाजातून देखील भाविकांना श्रींचे दर्शनास मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. दत्तघाटावरून महापूजेसाठी मंदिरात पाणदरवाजातून देखील प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरात आरोग्यसेवा व विशेष स्वच्छतेसाठी स्वकाम सेवकांसह सेवेसाठी इतर स्वयंसेवी संस्थाचे सेवक तसेच देवस्थानचे सेवक तैनात करण्यात आले आहेत. जनरेटर तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्द्ध ठेवण्यात आली असल्याचे वीर यांनी सांगितले.

यात्रा नियोजनावर प्रशासकीय नजर
भाविकांची कार्तिकी वारी यात्रा दरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रत्यक्ष नियंत्रण व मार्गदर्शनानुसार झालेल्या सूचना आदेशाप्रमाणे विविध शासकीय खात्याचे अधिकारी, कर्मचारी काम करतात की, नाही याची दिवसभर पाहणी केली. पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, तहसीलदार विठ्ठल जोशी, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे, आळंदीचे मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक यांचे सर्व सहकारी, व्यवस्थापक माउली वीर यांनी यात्रेचे नियोजन केले आहे.

मोफत स्वच्छतागृहे
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मोफत स्वच्छतेची सुविधा उपलब्द्ध केली आहे. अनेक भाविक इंद्रायणी नदी घाट, नवीन एस.टी.स्टॅन्ड परिसर, इंद्रायणी नदीच्या परिसरात नैसर्गिक विधी उघड्यावर उरकताना दिसत आहेत. आळंदी नगरपरिषद हगणदारीमुक्त जाहीर असल्याने नागरिकांनी उघड्यावर स्वच्छतेस न बसता स्वच्छतागृहांचा वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेने स्वतःच हगणदारी मुक्तची घोषणा करून पुरस्कार मिळवला. मात्र नियोजन, जनजागृतीकडे इंद्रायणी नदी घाट परिसरात दुर्लक्ष झाले आहे.