आळंदी : नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली गेस्टहाउस येथे नुकतीच विशेष बैठक पार पडली. बैठकीला नगराध्यक्षा वैजयंताताई उमरगेकर, सीईटो संतोष टेंगळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता राजन पाटील यांच्यासह नगरसेवक प्रशांत कुर्हाडे, बालाजी कांबळे, सचिन गिलबीले, प्रकाश कुर्हाडे आदी उपस्थित होते.
…या प्रश्नांवर मंथन
यावेळी आळंदीकरांसाठी भेडसावणारा पाणी प्रश्न, देहुफाटा ते मोशीकडे जाणारा रस्त्याचा अपूर्ण असलेला उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. तसेच कचरा समस्या निकालात काढण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात यावा. पाणी समस्येवर मात करण्यासाठी भामा आसखेड योजनेतून पाणी उपलब्ध करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
…भाजप सर्व प्रश्न सोडणार
याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, आळंदी आणि परिसरातील नागरिकांनी भाजपला सत्ता दिली आहे. तालुकाध्यक्ष अतूल देशमुख यांच्या सूचनेनुसार या परिसरातील विकासकामांना चालना देण्यासाठी पाठपुरावा करू. नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे मिळतील, याची काळजी घेण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या अधिकारातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी आम्ही पालकमंत्री गिरीश बापट आणि वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेऊन प्रश्न सोडविणार आहोत.