कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शाखा सुरू
आळंदी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अंतर्गत दिघी व आळंदी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रासाठी आळंदी देहू रस्त्यावर आळंदी येथे वाहतूक शाखेचे उद्घाटन आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे हस्ते उत्साहात झाले. देहू-आळंदी रस्त्यावर प्रशस्त जागेत वाहतूक शाखा सुरू करण्यात आली आहे. आळंदीमध्ये सुरू केलेल्या या शाखेच्या निर्णयाचे परिसरात स्वागत करण्यात आले. यावेळी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, पिंपरीचे माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, दिनेश वरूटे यांचेसह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत पदाधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
गुन्ह्यांचे वाढते प्रमाण
यावेळी आर.के.पद्नाभम म्हणाले की, पिंपरी आयुक्तालय सुरू झाल्यापासून अनेक नवीन योजना आणि महत्वाच्या ठिकाणी चौकी तयार करण्याचा विचार आहे. पिंपरी-चिंचवड सारख्या शहरामधून तसेच आजूबाजुच्या ग्रामीण भागातूनही गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे चोर्या, खून, दरोडे यांचे प्रमाण वाढले आहे. मंगळसूत्र चोर्यांचेही मोठे प्रमाण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी चौक्या, ठाणी उभारण्यात येत आहेत. आयुक्तालयास अधिक मनुष्यबळ कर्मचारी, अधीकारी मिळविण्याचा पाठपुरावा सुरु आहे. तसेच आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे आळंदीकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यासाठी ही वाहतूक शाखा सुरू केली आहे. आळंदीत वाहतूक शाखा सुरु होत असल्याने या निर्णयाचे स्वागत करून माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांचे हस्ते आयुक्त पद्मनाभन यांचा सत्कार करण्यात आला.