आळंदी ते शिरूर मार्गावर बससेवा सुरू करावी

0

स्थानिक नागरिकांसह भाविकांची एस.टी. प्रशासनाकडे मागणी

चिंबळी : एस.टी. महामंडळाने श्री क्षेत्र आळंदी ते शिरूर दरम्यान बससेवा सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून केली जात आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक मोठ्या संख्येने माऊलींच्या दर्शनासाठी नियमित येथे येत असतात. शिवाय शिरूर हेदेखील तालुक्याचे ठिकाण आहे. शिरूर ते आळंदी या मार्गावर बरीच गावे आहेत. मात्र, अद्यापपर्यंत एस.टी. महामंडळाने या मार्गावर बससेवा सुरू केलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक, भाविकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने या मार्गावर त्वरित बससेवा सुरू करावी, अशी मागणी आहे.

एस.टी. महामंडळाचे दुर्लक्ष
आळंदीहून वडगाव घेनंद, शेलपिंपळगाव, केंदूर, पाबळ, कान्हूर मेसाई, मोराची चिंचोली, मलठण, आण्णापूर, श्रीक्षेत्र रामलिंगमार्गे शिरूर अशी नवीन एस.टी. बससेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. आळंदीला दर एकादशीला तसेच गुरुवार, रविवारी यात्रा भरते. आषाढी/कार्तिकीला तर सर्वात मोठ्या यात्रा भरतात. सुट्टीच्या दिवशीदेखील प्रवाशांची संख्या अधिक असते. तरीही एस.टी. महामंडळाने या मार्गाकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशी वर्गात कमालीची नाराजी दिसून येत आहे.

खासगी वाहतूकदारांची मनमानी
सध्या या मार्गावर खासगी वाहनांशिवाय दुसरा पर्याय नाही. खासगी वाहनांमुळे प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत आहे. त्याचप्रमाणे खासगी वाहतूकदारांची अरेरावी, असुरक्षित प्रवास यामुळे प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. खासगी वाहतुकीमुळे प्रवाशांचा वेळही वाया जातो. त्यामुळे एस.टी. महामंडळाने या मार्गावर प्रातिनिधिक स्वरुपात नवीन बससेवेस प्रारंभ करावा. सुरुवातीला दर दोन तासांनी दोन्ही बाजुने बसेस सोडाव्यात, अशी मागणी आहे.