आळंदी नगरपरिषदेचा करवाढ नसलेला 3 लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

0

कर आणि दरवाढ नसलेला अर्थसंकल्प विशेष सभेत बहुमताने मंजूर : कचरा संकलन, साफसफाईसाठी 1 कोटी

आळंदी । आळंदी नगरपरिषदेच्या 2018-19 या आर्थिक वर्षाचा 3 लाख शिलकीचा अर्थसंकल्प शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. कर आणि दरवाढ नसलेला हा अर्थसंकल्प आहे. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. अर्थसंकल्पात 25 कोटी 68 लाख रुपये भांडवली जमा, 12 कोटी 3 लाख 30 हजार 600 रुपये महसुली जमा, तसेच आरंभीची शिल्लक 8 कोटी 55 लाख 30 हजार 869 रुपये जमा धरून 46 कोटी 26 लाख 61 हजार 469 रुपये अपेक्षित जमा धरण्यात आली आहे. यात 19 कोटी 81 लाख 15 हजार महसुली खर्च, भांडवली खर्च 26 कोटी 42 लाख 37 हजार रुपये तर एकूण खर्च 46 कोटी 23 लाख 52 हजार रुपये अपेक्षित आहे. 3 लाख 9 हजार 469 शिलकीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

पाणी पुरवठ्यासाठी 1 कोटी
रस्ते देखभाल दुरुस्ती 70 लाख, स्वच्छतागृहे देखभाल दुरुस्ती 6 लाख, इमारत देखभाल दुरुस्ती 50 लाख, शहरातील नाले, गटारे बांधकाम व देखभाल दुरुस्तीसाठी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अग्निशमन वाहन देखभाल दुरुस्ती 7 लाख, आरोग्य विभागातील वाहने दुरुस्ती 5 लाख, जीप व विद्युत विभागातील वाहन दुरुस्ती 3 लाख, प्रशासकीय वाहन खरेदी 25 लाख, कार्यालयीन फर्निचर खरेदी, देखभाल दुरुस्तीसाठी 5 लाख, शववाहिका खरेदी 5 लाख, संगणक देखभाल दुरुस्ती 10 लाख, नागरी सुविधा केंद्र सेवा 3 लाख, विद्युत विभाग देखभाल दुरुसती 30 लाख, बंधारा दुरुस्ती 12 लाख, जंतुनाशके खरेदी 50 लाख, घनकचरा व्यवस्थापन 15 लाख, जलशुद्धीकरण केंद्र व पाणी पुरवठा सेवेचा ठेका 1 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

वृक्षरोपण व संवर्धन 2 लाख
कचरा संकलन, वहन, शहर साफ सफाई सेवा 1 कोटी, आरोग्य विभागातील वीज पंप खरेदी व दुरुस्तीसाठी 8 लाख, प्रदूषण मंडळ वर्गणी 5 लाख, पाणी पुरवठा विभागातील वीज पंप खरेदी व दुरुस्ती 25 लाख, पाईप लाईन साहित्य खरेदी 50 लाख, पाणी रॉयल्टी 25 लाख, पाण्याच्या टाकीची देखभाल दुरुस्ती 70 लाख, नागरपरीषद इमारत रंगरंगोटी 5 लाख, सुगंधी द्रव्य खरेदी 2 लाख, जाहिरात फलकावर 2 लाख, सत्कार समारंभ 10 लाख, स्मारक देखभाल दुरुस्ती 5 लाख, यात्रा निधी अंतर्गत खर्च 1 कोटी 63 लाख, वृक्षरोपण व संवर्धन 2 लाख, सीसीटीव्ही बसविण्यासाठी 5 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

अल्पसंख्यांकांसाठी 10 लाख
अल्पसंख्याक प्राथमिक सोयी सुविधांसाठी 10 लाख, विकास कामांसाठी 10 लाख, विशेष अनुदान 50 लाख, 14 व्या वित्त आयोग योजनेतून 25 लाख, नगरोत्थान जिल्हास्तर 20 लाख 50 हजार, रमाई आवास योजनेअंतर्गत निधी 25 लाख, रस्ते विकासासाठी 35 लाख, दलित वस्ती सुधारणा 50 लाख, अल्पसंख्याक बहुल वस्ती सुधारणा अनुदान 1 लाख, दलित नागरी वस्ती सुधारणा पाणी पुरवठा 10 लाख अनुदानाची तरतूद आहे.

लग्नांवर अतिरिक्त सेवा शुल्क
आळंदीत होत असलेल्या लग्न समारंभ यावर नियंत्रण आणि नगरपरिषदेच्या यंत्रणेवर येणार बोजा यावर उपाय योजना म्हणून यावर्षी 1 एप्रिलपासून पुढे होणार्‍या आळंदीतील लग्नांवर अतिरिक्त सेवा शुल्क म्हणून 500 रुपये आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या सभेत घेण्यात आला. या शिवाय शहरातील वाहनतळ शुल्क आकारणीत पहिल्या टप्प्यातील हलक्या वाहनांवर वाढीव दराने शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.