आळंदी नगरपालिकेला 14 हजार डस्ट बिन भेट

0

आळंदी । सामाजिक बांधिलकीतून मरकळ येथील एन्प्रो इंडिया प्रा.लिमिटेड कंपनीतर्फे आळंदी नगरपालिकेस 14 हजार डस्ट बिन भेट देण्यात आले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी ही भेट स्वीकारली. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करकरे यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. कंपनीचे वतीने व्यवस्थापक देवेंद्र देशपांडे, सी. एस. आर. कमिटीच्या सदस्या कल्याणी कुलकर्णी, सदस्य रावजी कंद यांनी डस्ट बिनचे हस्तांतरण केले. यावेळी उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका प्रतिमा गोगावले, शैला तापकीर, अर्जुन मेदनकर, दत्तात्रय काळे, उत्तम गोगावले, अविनाश तापकीर आदींसह महिला व कामगार उपस्थित होते.

घराघरातील ओला व सुका वेगळा करावा याबाबत जनजागृती करीत या डस्ट बिनचे वाटप शहरातील 9 प्रभागात होणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापन करण्यास गती देण्यासाठी उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर आदी आळंदीत लोकसहभाग वाढविण्याचे धोरण स्वीकारत त्याचा ठराव देखील यासाठी मंजूर केला होता. एन्प्रो इंडिया कंपनीच्या वतीने देण्यात आलेले डस्ट बिन घरा घरातून थेट कचरा वर्गीकरण करण्यास लाभ दायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.