आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीच्या मंजूर विकास आराखडा योजनेतील आळंदी बाह्यवळण मार्गाचे भूमिपूजन नुकतेच आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि खेडचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांचे हस्ते उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, सचिन गिलबिले, सागर बोरुंदिया, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, सचिन पाचुंदे, बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड, मंडूबाबा पालवे, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर, गंगाधर मुंगसे, संदेश तापकीर, मंडलाधिकारी ज्ञानेश्वर कारकर, मनोहर दिवाणे, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.
18 मीटर रुंदीचा रस्ता
आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील मंजूर बाह्यवळण मार्गाची रुंदी 18 मीटर असून, या रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन आळंदी-केळगाव रस्त्यालगत करण्यात आले. इंद्रायणी नदी घाट (ज्ञानेश्वर महाराज बाग) ते चाकण रस्ता जोडणार्या रस्त्याच्या विकास कामाला सुरुवात करण्यात आली. या बाह्यवळण रस्त्यामुळे आळंदीतील मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने येत्या कार्तिकी यात्रेपूर्वी आळंदीला जोडणारे रस्ते विकसित होतील, अशी अपेक्षा आहे.