आळंदी यात्रेसाठी पीएमपीच्या 124 जादा गाड्या

0

आळंदी : कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पीएमपीतर्फे 124 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये नियमीत 65 व जादा 124 अशा एकूण 189 बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बसेस दि. 11 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत. यासाठी आळंदीतील बसस्थानक चर्‍होली फाटा येथे हलविण्यात येणार आहे. चिंचवड, पिंपरी, स्वारगेट, भोसरी, निगडी, रहाटणी, देहुगाव, म.न.पा भवन, हडपसर, पुणे स्टेशन या ठिकाणावरुन या गाड्या सुटणार आहेत. या दहा बसस्थानकावरुन दि. 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान जादा गाड्या धावणार असून, रात्री दहानंतर या जादा बसेसना नेहमीच्या तिकीट दरापेक्षा 5 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. तसेच रात्री अकरानंतर ज्येष्ठ नागरिक, मासिक, साप्ताहिक, एकदिवसीय असा कोणत्याच पासचा लाभ नागरिकांना घेता येणार नाही.

बहुळगाव मार्ग बंद
दरम्यान, मनपा बहुळगाव हा मार्ग या काळात पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच वाघोली- आळंदी या मार्गावरील बस मरकळ रोडवरील लक्ष्मीकार्यालय येथून सुटणार आहेत, असे पीएमपी प्रशासनातर्फे कळवले आहे.