आळंदी । आळंदी देवाची येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आळंदी सोसायटीच्या पंचवार्षिक सदस्य पदांचे निवडीसाठी रविवारी (दि.27) मतदान व मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंतिजे मुलाणी यांनी दिली.
याआधी चार जागांवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत. यात माजी नगराध्यक्ष विलास कुर्हाडे यांचे नेतृत्वाखालील संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी पॅनलने चार जागा मिळवीत आघाडी घेतली आहे. उर्वरित 9 जागांसाठी 18 उमेदवारांचे अर्ज राहिल्याने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. यात रविवारी (दि.27) आळंदी-केळगावमधील शेतकरी सभासद येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान करतील. त्यानंतर त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने मतमोजणी साठीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी नंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुलाणी यांनी सांगितले.
बिनविरोध येण्याच्या प्रयत्नास अपयश आले. स्थानिक संस्थेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध होण्याची गरज सभासदांमधून व्यक्त होत होती. नऊ जागांसाठी 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी पॅनल (चिन्ह-विमान) व श्री संत ज्ञानेश्वर माउली शेतकरी पॅनल (चिन्ह-बस) या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. कुर्हाडे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी पॅनलने 13 पैकी 4 जागा बिनविरोध मिळवीत आघाडी घेतली आहे. महिला प्रतिनिधींच्या 2 जागासह 4 जण बिनविरोध निवडून आले आहेत. यात महिला प्रतिनिधींच्या 2 जागा राखीव गटातून आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सुशीला कुर्हाडे, ताराबाई मुंगसे इतर मागासवर्गीय संवर्गासाठी राखीव जागेवर माजी सरपंच सोमनाथ मुंगसे आणि आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांची भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी राखीव असलेल्या एका जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.