‘आवर्तन’ ढोल-ताशा पथकाचा आवाज देशाच्या राजधानीत धुमणार!

0

पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, शहरातील ढोल-ताशा पथकातील सहकार्‍यांनीही कंबर कसली आहे. शहरातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथके आता पुढचे दहा दिवस विविध मंडळांच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होतील. आपल्या शहरातील काही पथके प्रामुख्याने पुणे व पिंपरी-चिंचवडसह मुंबई, ठाणे, कल्याण या भागातील मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. काही पथके राज्यातील इतर जिल्ह्यांमधील मिरवणुकांमध्येही सहभागी होतात. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील ’आवर्तन’ या ढोल-ताशा, ध्वज पथकाने थेट दिल्ली दरबारी आपली कला सादर करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आवर्तन पथकातील सहकार्‍यांचा एक गट नुकताच दिल्लीला रवाना झाला आहे. या पथकाला दिल्लीतील गणेशभक्तांसमोर कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न
‘आवर्तन’ने आजवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये गणेशोत्सवाची धूम उडवली आहे. आपल्या प्रत्येक सादरीकरणातून प्रत्येक वेळी पथकाने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी तसेच प्रत्येक उत्सवादरम्यान थोड्या-अधिक प्रमाणात होणारा धांगडधिंगा कमी करण्यासाठी ढोल-ताशा पथक हा योग्य मार्ग आहे. तसेच ढोल-ताशा आणि ध्वज पथकांच्या माध्यमातून आपल्या परंपरा, संस्कृती यांचे रक्षण होते. समाजाच्या एकत्रीकरणासाठी असे समाजोपयोगी उपक्रम होणे आवश्यक आहे.

70 सदस्यांचा ताफ्यात सहभाग
राज्याबाहेर; तेदेखील देशाच्या राजधानीतील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे नक्कीच आव्हानात्मक होते. परंतु, गटातल्या मुलांचे उत्कृष्ट सांघिक काम व श्री गणेश सेवा मंडळाचे नारायण बाहेती यांच्या संपूर्ण सहकार्यामुळे हे शक्य होत आहे. दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात श्री गणेश सेवा मंडळाच्या शोभायात्रेत आवर्तनचे ध्वजपथक अग्रभागी असणार आहे. गटातील 70 सदस्यांचा या ताफ्यात सहभाग आहे, असे ’आवर्तन’ पथकाचे निखिल तळेगावकर यांनी सांगितले.

पथकाचे यंदाचे आठवे वर्ष
राजधानी दिल्लीत वादन करायला मिळणार म्हणून सर्व वादक अतिशय उत्सूक आहेत. ’आवर्तन’ या गणेशोत्सव पथकाचे यंदा आठवे वर्ष आहे. या निमिताने गणेशोत्सवाची आपली गौरवशाली परंपरा दिल्लीतील जनासमुदायासमोर सादर करणे नक्कीच अभिमानास्पद आहे. विधायक गणेशोत्सवाच्या संस्कारांचा प्रसार करणे, हेच पथकाचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी या सारख्या उपक्रमांची नक्कीच मदत होईल, असा विश्वासदेखील तळेगावकर यांनी व्यक्त केला.