नेरुळ । एनएमएसएसएस व आम्ही उद्योगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यशाळेत आवाज व संभाषण कौशल्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कळंबोली येथील सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्रात झालेल्या या कार्यशाळेत पनवेल तालुका तसेच नवी मुंबईतील 44 महिलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत व्हॉईस कोच पद्मश्री राव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत उपस्थित महिला व मुलींना आवाजाचे महत्त्व पटवून देताना आवाज शांत व हळूवार असल्यास त्याचे किती चांगले परिणाम आपल्याला मिळतात हे रोजच्या घरगुती उदाहरणातून महिलांना पटवून दिले.
ओंकाराने करा संस्कार
आपणच आपल्या आवाजावर रोज संस्कार केल्यास आवाजात स्पष्टता येऊ शकते हे सांगताना स्वतः नियमित आपला आवाज ऐकण्याची सवय लावा त्यातील गोडवा जाणून घ्या व आपले बोलणे इतरांना कसे भावेल याचा विचार करा, असे व्हॉईस कोच पद्मश्री राव यांनी सांगितले. नियमित ओंकार केल्यास आवाजावर चांगले संस्कार करता येतात तसेच मनाला शांती व आनंद प्राप्त होते. मन व डोके शांत ठेवल्यास मनातील सकारात्मका तुमच्या संभाषणात दिसेल व त्याचे निश्चित सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतील. सोबत विविध उद्घोषणा ऐकवून, विविध प्रात्याक्षिकाद्वारे संभाषण कौशल्य कसे वाढवता येईल हेही शिकविले. कथाकथन, वाचन, स्वताची ओळख अशा अनेक पदधतीने संभाषण नेमके व अचूक कसे करता येईल हे शिकविले. विविध ठिकाणी शिष्टाचार कसे पाळावेत याचेही धडे पद्मश्री राव यांनी महिलांना दिले.