बारामती । प्रधानंत्री आवास योजनेचा समाजातील दुर्बल घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी सामुहीक प्रयत्न करणे गरजेचे आहे. लाभार्थी कोणत्याही परिस्थितीत या योजनेपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या आहेत. बारामती पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य भारत गावडे, राहुल भापकर, अबोली भोसले, प्रदिप धापटे, लिलाताई गावडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे यावेळी उपस्थित होते.
जनहिताची कामे हाती घ्या
तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची मंजुर कामे व सुरू असलेली कामे तसेच प्रलंबित कामांची माहिती गटविकास अधिकार्यांकडून मिळत आहे. सुरू असलेल्या कामांची विस्तार अधिकारी व संबंधित गावच्या ग्रामसेवकाकडून पडताळणी करून घेण्यात यावी. राज्यसरकारच्या रकमेचा विनियोग होणे महत्त्वाचे आहे, असे निकम यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योेजनेतील कोणती कामे घेता येतील यांची नावे देता यावीत, सदस्यांनी या योजनेतून आपल्या कार्यक्षेत्रात कामाची वर्गवारी करून जनहिताची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मतही निकम यांनी व्यक्त केले.
839 घरकुले मंजूर
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2016-17 साठी एकूण 839 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यातील 829 जणांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला असून 486 जणांना दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. तालुक्यातील घरकुलांची 11 कामे पूर्ण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी यावेळी दिली. राज्यशासन पुरस्कृत पंडित दिनदयाळ उपाध्याय सहाय्य योजना सन 2016-17 साठी एकूण 5 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यापैकी एका प्रकरणाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. तसेच आणखी एका प्रकरणाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला असल्याचे काळे यांनी सांगितले.