पिंपरी-चिंचवड । प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत चर्होली, रावेत आणि मोशीतील बोर्हाडेवाडीमध्ये बांधण्यात येणार्या गृहप्रकल्पाच्या ’डीपीआर’ला राज्य शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. नागरी भागासाठी पंतप्रधान आवास योजनेतून शहराच्या विविध भागात 10 ठिकाणी नऊ हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार च-होली येथे 1442, रावेतमध्ये 1080, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी – बोर्हाडेवाडीमध्ये 1400, वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे.
या योजनेच्या प्रत्येक ठिकाणचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीने च-होली, रावेत आणि मोशीतील बोर्हाडेवाडी या तीन ठिकाणी राबविल्या जाणार्या या योजनेच्या डीपीआरला शुक्रवारी मंजुरी दिली आहे. आता या डीपीआरला केंद्र सरकारची मंजुरी घेतली जाणार असून, त्यानंतर याठिकाणी एकूण तीन हजार 664 घरे बांधण्यात येणार आहेत. या तीनही प्रकल्पांना एकूण 377 कोटी 28 लाखांचा खर्च येणार आहे.