जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
जळगाव : दुकानात अचानक आलेल्या दोन जणांनी काका तसेच पुतण्या अशा दोघांवर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना रविवार आव्हाणे (ता.जळगाव) येथे घडली. श्रीकांत दत्तात्रय चौधरी (37) तसेच महेंद्र (शिवाजी) ज्ञानेश्वर चौधरी (19) रा.आव्हाणे अशी जखमींची नावे असून दोघांवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्लयात महेद्र याच्या गळयातील 15 ग्रॅमची चैन तसेच दुकानातील 57 हजारांची रोकडही लांबविण्यात आल्याची माहिती जखमींना दिली आहे.
पंधरा ग्रॅमची चैन गहाळ
जखमींच्या माहितीनुसार यांच्या कुटुंबातील सदस्य लग्नानिमित्त आज बाहेर गावी गेले होते. त्यामुळे दोघे जण घरी होते. गावात महेंद्र चौधरी यांचे रिचार्ज तसेच वस्तू विक्रीचे दुकान आहे. आज सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारात महेंद्र हे दुकानात बसले होते. दरम्यान याठिकाणी महेंद्र हा येऊन दुकानावर थांबला. काका पुतण्या असे दोघे जण गप्पा मारत असताना अचानक सोपान सुभाष पाटील तसेच पवन गोपाल पाटील असे दोघे जण दुकानात शिरले. पवन याने ब्लेडने गळयावर वार करण्याचा प्रयत्न केला असता महेंद्र याने वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्याच्या छातीवर तसेच गळयाजवळ महेंद्र याच्यावर वार केले. श्रीकांत चौधरी यांना चापटाबुक्क्यांनी छातीवर तसेच चेहर्यावर मारहाण केली. महेंद्र याच्या गळयातील पंधरा ग्रॅमची चैन गहाळ झाल्याचे त्याने सांगीतले.
57 हजारांची रोकडही लांबविली
वर्षभरापूर्वी श्रीकांत यांच्यावर एन्जोग्राफी करण्यात आली आहे. त्यात त्यांना हाताबुक्यांनी छातीवर दुखापत करण्यात आली. श्रीकांत यांचा भाऊ दीपक चौधरी यांनी दोघांना तालुका पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर जिल्हाशासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. श्रीकांत यांनी सांगीतले, मित्रांकडून 50 हजार रूपये घेतलेले पैसे तसेच केळीचे आलेले साडे सात हजार अशी सर्व रक्कम गल्ल्यात ठेवली होती. ही रक्कम घेऊन ते आज चोपडा येथे देण्यासाठी जाणार होते. परंतु अचानक झालेल्या हल्यात ही रोकड लंपास झाली.