आव्हाणेत एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी

0

जळगाव । तालुक्यातील आव्हाणे येथील सरुबाई नगरातील घरात कुटुंबिय झोपलेले असतांना मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान चोरट्यांनी एकाच रात्री गावात दोन ठिकाणी चोर्‍या केल्या आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आव्हाणे येथील सरुबाई नगरात अजय गंगाराम सपकाळे यांचे घर आहे. अजय सपकाळे हे गवंडीकाम करतात. दरम्यान त्यांची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेल्या असल्याने आई व आजी घरी होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अजय याने रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवला होता.

दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील 5 हजार रुपये रोख, 3 हजार 300 रुपयांची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 2 हजार 200 रुपये किंमतीचे 30 भार वजनाचे चांदीचे कडे, बँकेचे कागदपत्रे असा 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. दरम्यान सकाळी 6 वाजता अजय याच्या घरातील सामान सुभाष गुजर यांना घराबाहेर पडलेला दिसून आला. त्यांनी अजय याला आवाज देवून उठविल्यानंतर अजय याला घरात चोरी झाल्याचे समजून आले. चोरट्यांनी अजयच्या घरात चोरी केल्यानंतर त्याच रात्री लोकेश संजय येशी यांच्या घरात देखील चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्याच्या घराच्या कोठीमध्ये असलेल्या बॅगमधून लोकेशचे शैक्षणिक कागदपत्रे चोरून नेली. दरम्यान, अजय सपकाळे यांच्यासह लोकेश येशी यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.हे.कॉ. उमेश ठाकुर करीत आहे.