जळगाव। शौक्षणिक वर्ष 2017-18 करीताचे आव्हान 2017 राज्यस्तरीय चान्सलर बिग्रेड आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे 1 ते 10 जून, 2017 या कालावधीत होत असून त्यासाठी उमविचा संघ कोल्हापूरला रवाना झाला. या संघाला कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी जिल्हानिहाय संघाचे एक दिवशीय प्रशिक्षण 30 मे रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
मागील वर्षी संघ ठरला होता अव्वल
याप्रसंगी बोलताना कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, आव्हान प्रशिक्षण शिबिर हे खरोखर आव्हानात्मक असून त्याला आव्हानासारखे सामोरे जावून या प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त कला अवगत करुन संघाचे कार्य प्रभावीपणे करुन पुरस्कार मिळवा. संघ प्रशिक्षण व एकत्रीकरणातून आव्हान, 2017 साठी जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्हयातील प्रत्येकी 20 विद्यार्थी, 10 विद्यार्थिनी व संघ व्यवस्थापक (1 पुरुष+1 महिला) असे एकूण 96 जणांचा संघ सहभागी होत आहे. 2016-17 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आव्हान आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात उमविचा संघ संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला होता. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुध्दा आपला संघ अव्वल ठरावा, अशी कुलगुरुंनी अपेक्षा व्यक्त केली.संघ प्रशिक्षण व एकत्रीकरण शिबिरात रासेयोचे प्र.संचालक प्रा.एस.टी. इंगळे, प्रा.दयाधन राणे, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ.अविनाश निकम, विभागीय समन्वयक प्रा.साहेब पडलवार, प्रा.सोपान बोराटे यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले.