वाघोली । परिसरात वाघोली-आव्हाळवाडी रस्त्या हा रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यालगत या परिसरातील सर्वात मोठा आठवडे बाजारही भरत असतो. वाढत चाललेली खासगी बांधकामे व गृहप्रकल्पामुळे बाहेरील अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनीही या परिसरात आपली व्यवसायिक दुकाने थाटली आहेत. त्यात किराणा, हॉटेल, केशकर्तनालय, चायनीज सेंटर, गँरेज आदी व्यवसायाचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर महामार्गावरील दोन वाइनशॉप वाघोली मांजरी रोडवर याच परिसरात स्थलांतरीत झाल्यामुळे दिवसेंदिवस छोट्या-मोठ्या हॉटेल व मांसाहरी उपहारगृहांची संख्या वाढत आहे.
या रस्त्यालगतच बाजार मैदान परिसर, खंडोबा मंदिर परिसरातील ओढ्यालगत ’रेमंड इंग्लिश स्कूल’ या छोट्या मुलांच्या खासगी शाळेजवळचे परिसरातील गृहप्रकल्प व खासगी प्लॉटिंगमधील बांधकामधारक रहिवासी आपल्या घरातील ओला, सुका कचरा व राडारोडा या ठिकाणी सतत टाकतात. तसेच या रस्त्यावरील केस कर्तनालय, हॉटेल व मटण-चिकन व्यवसायिकांबरोबरचं, आठवडे बाजारातील फळ व भाजीपाला विक्रेते आपला उरलेल्या भाजीपाल्याचा खराब व सडका कचरा, राडारोडा व जवळील प्लास्टिक कचरा येताजाता कचरा पेटीत न टाकता रोडच्या कडेला ताकत असल्याने या परिसरात प्रचंड कचरा साचल्याने या परिसरात राहणार्या स्थानिक रहिवासी व शाळेतील मुलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या कचर्यामुळे सध्या अनेक साथीच्या व संसर्ग जन्य आजारामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरिया या आजारांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरुन रोज येणार्या-जाणार्या विद्यार्थी,कामगार वर्ग व प्रवाशांना या कचर्याच्या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.या कचर्यामुळे अन्नाच्या शोधात फिरणारी अनेक मोकाट भटकी कुत्री या परिसरात येत असतात.अनेक वेळा ती मोकाट भटक्या कुत्री पायी जाणार्या नागरिक व प्रवाशांवर चावा घेण्यासाठी अंगावर धावुनही जातात,चावतातही.या कुत्र्यांच्या भांडणामुळे रोडवरील भांडणामुळे दुचाकीवरूचे अपघाताचाही घडत असतो.
लेखी तक्रार करणार
वाघोली ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी सांगून व लेखी निवेदन देऊनही ग्रामपंचायतीने कचरा उचलण्यासाठी अद्यापपर्यंत कोणताही प्रयत्न केलेला नाही. या आडवड्याभरात हा कचरा उचलला गेला नाहीतर गटविकास अधिकारी, हवेली यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे.
– गणेश सातव, सामाजिक कार्यकर्ते
नागरिकांना आवाहन
वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वच ठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत, तर सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपला कचरा रोडच्या कडेला किंवा इकडे-तिकडे न फेकत त्या कचरापेटीत टाकण्यात यावा. रस्त्याच्या कडेला कोणी राडारोड किंवा कचरा टाकताना दिसल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– समीर भाडळे, उपसरपंच वाघोली