जळगाव । आशाबाबा नगरातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 1 लाख 80 हजार रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच चोरट्याने घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांकडून देखील घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, चोरट्यांबाबतचे कोणताही सुगावा त्यांना मिळून आलेला नाही.
वहिनींचे दागिने ठेवले होते घरात
शहरातील आशाबाबा नगरात मिनाक्षी सजन भालेराव या महिला मुलगा अभिलाष याच्यासह राहतात. गेल्या महिन्याभरापूर्वी मिनाक्षी भालेराव यांचे भाऊ दिपक हे कुटूंबियांसोबत त्यांच्याकडे आले. तेव्हा पुन्हा पुन्हा दिवाळीत या ठिकाणी येणार असल्याने त्यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने बहिण मिनाक्षी यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले. त्यानंतर पुन्हा ते आपल्या घरी परतले. 8 सप्टेंबर रोजी अभिलाष हा दिपक यांच्यासोबत मुंबई येथे काही कामानिमित्त गेला होता. त्यामुळे घरी मिनाक्षी ह्या एकट्याच असल्याने जिल्हा कारागृह निवास स्थान येथे वास्तव्यास असलेले मेव्हुणे प्रकाश धुरंदर यांच्याकडे त्या अधून-मधून ये-जा करत असत. 14 ला त्या दोन दिवसांसाठी मेव्हुणे धुरंदर यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या होत्या.
मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले
त्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कुलूप तोडून घरातून लाखो रूपयांचे दागिने चोरून नेले. 16 रोजी भालेराव ह्या घरी परतल्यानंतर त्यांना त्यांच्या घराचा दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. ही माहिती लागलीच त्यांनी मेव्हुणे व बहिणीला सांगितल्यानंतर त्यांनी काही वेळातच आशाबाबा नगर गाठले. तिघांनी घरात प्रवेश करत पाहणी केल्यानंतर दिपक यांच्या पत्नीचे घरात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. तर घरातील सामान देखील अस्ताव्यस्त फेकलेले होते. भालेराव यांनी लागलीच रामानंदनगर पोलिसांची संपर्क साधत चोरी झाल्याची माहिती दिली.
असा गेला मुद्देमाल
52 हजार 500 रुपये किंमतीचे 35 ग्रँम वजनाच्या पाटल्या, 30 हजार रूपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे ब्रासलेट, 52 हजार 500 रुपयांचे 2 ग्रॅम वजनाच्या दोन चेन व 2 पदक, 15 हजार रूपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाच्या अंगठ्या व त्यात सोन्याचा तुकडा तर 30 हजार रूपयांची रोकड असा एकूण 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी मिनाक्षी भालेराव यांच्या घरातून चोरून नेला आहे. याप्रकरणी आज सोमवारी मिनाक्षी भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.