आशा सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने

0

पुणे । राज्यातील ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची बँकखाती आधारकार्डशी संलग्न झाली नाहीत, अशा सेविकांचे जून ते डिसेंबर 2017 या कालावधीमधील मानधन जुन्या पद्धतीने करावे असा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्य शासनाने पीएफएमएस प्रणालीद्वारे सेविकांच्या बँक खात्यात मानधन थेट जमा करण्याची कार्यपद्धती प्रायोगिक तत्त्वावर फेब्रुवारी, 2017पासून सुरू करण्याबाबत आयुक्तालयात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना या प्रणालीत मानधन अदा करणे शक्य झाले नाही. राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या 2 लाख 7 हजार इतकी असून त्यातील आत्तापर्यंत 1 लाख 85 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन पीएफएमएस प्रणातील अदा करण्यात आले आहेत. काही सेविकांनी बँकखाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे त्यांचे जूनपासूनचे मानधन अदा करण्यात आले नाही. सेविकांना दरमहा त्यांचे मानधन वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकांची बँकखाती आधारकार्डशी संलग्न झालेली नाहीत अशा सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने अदा कारावे. असा निर्णय शासनाने घेतला आहे.