आशियाई क्रीडा : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

0

जकार्ता :आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला जपानकडून पराभवाला सामोरे जात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या अटीतटीच्या लढतीत भारताचा १-२असा पराभव झाला. १९९८नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीमध्ये भारतीय संघाने रौप्य पदक पटकावले आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघ केवळ एकच गोल करू शकला. नेहा गोयलने २५ व्या मिनिटाला भारतासाठी हा गोल केला. तर, जपानच्या संघाने दोन गोल केले. जपानने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. आजच्या सामन्यात मिळालेल्या तीन पेनल्टी कॉर्नरपैकी एक भारताला मिळाला, मात्र भारताला या संधीचा फायदा घेता आला नाही.

भारताने १९९८मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. तर, भारतीय महिला हॉकी संघाने १९८२ मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. भारतीय महिला हॉकी संघाला आज ३६ वर्षांनंतर दुसरे सुवर्णपदक पटकावण्याची संधी आली होती. या संधीचे सोने करत भारत २०२०च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल अशा भारतीयांच्या अपेक्षा होत्या, मात्र त्या फोल ठरल्या.