नवी दिल्ली : यजमान भारताला ३७व्या आशियाई ट्रॅक सायकल अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दोन कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या निराशाजनक कामगिरीमुळे भारताची अकराव्या स्थानी घसरण झाली. दक्षिण कोरियाने ९ सुवर्ण, १३ रौप्य आणि ८ कांस्यपदकांसह सांघिक जेतेपद पटकावले. चीन (८ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य) आणि जपान (७ सुवर्ण, ५ रौप्य आणि १३ कांस्य) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या हाँग काँगच्या ली वेई झे हीने (३ सुवर्ण) सर्वोत्तम महिला खेळाडूचा मान पटकावला.
मैदान आहे जागतिक दर्जाचे
आशियाई ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धेत यजमान भारताला अपयश आले असले तरी भविष्यात भारतात विश्वचषक मालिका आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धा होऊ शकतील, असे सूतोवाच जागतिक सायकल महासंघाचे प्रमुख ब्रायन कुकसन यांनी केले. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममधील सायकलींच्या शर्यतीसाठी असलेले रिंगण (वेलोड्रम) हे जागतिक दर्जाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या मैदानाची क्षमता फार चांगली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
भारतात मोठ्या स्पर्धा होऊ शकता
कुकसन म्हणाले, ‘भारतात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन होऊ शकते का, याबाबत मी भारतीय सायकलिंग महासंघातील (सीएफआय) काही मित्रांशी चर्चा करत होतो. या स्पर्धामध्ये विश्वचषक मालिकेचा समावेश असू शकतो. जागतिक दर्जाची स्पर्धा येथे आयोजित न करण्यामागे कोणतेच कारण नाही. भविष्यात विश्व अजिंक्यपद स्पर्धाही येथे आयोजित केली जाऊ शकते. हे सर्व काही शक्य आहे. त्यादृष्टीने आम्ही पाऊल उचलणार आहोत.’
सायकलिंगमध्ये डोपिंग अधिक
सायकलिंगमध्ये जास्त प्रमाणात उत्तेजक सेवनाची प्रकरणे आढळतात. यामुळे या खेळाकडे वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहण्यात येते. त्याबाबत कुकसन म्हणाले की, ‘उत्तेजक सेवनाचा खेळ अशी प्रतिमा हळूहळू नाहीशी होत चालली आहे. आता उत्तेजकविरुद्ध लढणारा खेळ अशी आमची ओळख निर्माण झाली आहे. चुकांमधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. अनेक राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थां आमच्याशी संलग्न आहेत. त्यामुळे गमावलेला विश्वास आम्ही पुन्हा कमवला आहे.’