आशियाई मिश्र अजिंक्यपद स्पर्धेतून सायना-सिंधूची माघार

0

हैदराबाद : व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी पहिल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. सायना आणि सिंधू यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळेच घेतला असल्याचे सांगितले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोघींनी हा निर्णय घेतला आहे.

तन्वी- रितुपर्णावर महिला एकेरीची भिस्त

सायना व सिंधूच्या गैरहजेरीत तन्वी लाड आणि राष्ट्रीय विजेती रितुपर्णा दास हे महिला एकेरीचे आव्हान सांभाळतील, तर पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय आणि सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धा जिंकणारा समीर वर्मा हे स्पध्रेत सातत्यपूर्ण कामगिरीसाठी प्रयत्नशील असतील. ‘‘सायना आणि सिंधूच्या अनुपस्थितीमुळे जेतेपद पटकावण्याच्या आमच्या संधीवर परिणाम होणार आहे, परंतु युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही चांगली संधी आहे,’’ असे प्रणॉय म्हणाला.

मिश्र दुहेरीत प्रणव- रेड्डी

आशियाई देशांमधील ही महत्वाची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत तीन दुहेरी सामने होणार असून मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि ए. सिक्की रेड्डी यांच्यावर धुरा आहे. या जोडीने गत महिन्यात सय्यद मोदी स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. पुरुष दुहेरीत बी. सुमीत रेड्डी आणि मन्नू अत्री, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांच्यावर मदार आहे. या स्पर्धेत भारताला ‘ड’ गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर कोरिया आणि सिंगापूरचे आव्हान आहे. यासह चीन, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंड यांच्यातही संघर्ष पाहायला मिळेल.