क्वालालम्पूर । नवख्या अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानचा पराभव करत 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणार्या पाकिस्तानचा अफगाणिस्तानने 185 धावांनी दणदणीत पराभव करत नवीन इतिहास रचला. इकराम फैजीने दमदार फलंदाजी करत 107 धावांची शतकी खेळी केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करतानाअफगाणिस्तानने 248 धावा केल्या. त्याला उत्तर देताना पाकिस्तानचा डाव 22.1 षटकात केवळ 62 धावांवर गडगडला. सामनावीर ठरलेल्या अफगाणिस्तानच्या मुजीब जादरानने 13 धावांमध्ये पाच विकेट्स मिळवल्या. या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. त्यांच्या नऊ फलंदाजांना दुहेरी धावाही करता आल्या नाहीत.
नवी ऊल हकच्या कर्णधारपदाखाली खेळणार्या अफगाणिस्तानी संघाने नेपाळला हरवुन अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. दुसरीकडे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर पाकिस्तानने बांगलादेशाला हरवुन अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करायला मिळाल्यावर रहमान गुल आणि इब्राहीम जादरान या जोडीने पाहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागिदारी केली. रहमान बाद झाल्यावर इकरामने धडाकेबाज फलंदाजी करत शतक पुर्ण केले. पाकिस्तानच्या मोहम्मद मुसाने तिन विकेट्स मिळवल्या. त्यानंतर मुजीबच्या प्रभावी गोलंदाजीसमोर एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने पाकिस्तानचे फलंदाज बाद होत गेले. पहिल्या तिन षटकांमध्येच पाकिस्तानची सलामीची जोडी माघारी परतली होती.