आशिर्वाद पॅनलचे तीन तर सहकार पॅनलचे दोन जण सहलीला !

0

हालचालींमागे उच्चभ्रू व तरबेज जेष्ठ व्यापारी मंडळी असल्याचा कयास

अमळनेर । जितेंद्र ठाकूर

खान्देश निवडणूकीतील जातीयवादामुळे गाजलेल्या ऐतिहासिक व सर्वसमावेशक निकालानंतर नविन सत्ताधारी मंडळ निवडण्याचा दृष्टीने पुन्हा अनपेक्षित व धक्कादायक हालचालींना वेग आला आहे. यामुळे अमळनेरच्या राजकीय विश्‍वात सामाजिक व जातीय पातळीवर उलटसुलट चर्चांना उत आला आहे. तर तरुण संचालक सत्तेत व जेष्ठ संचालक सत्तेबाहेर अश्या होऊ घातलेल्या प्रकारामुळे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ म्हणायची वेळ आली आहे. खान्देश शिक्षण मंडळ ही संस्था शैक्षणिक असली तरी अमळनेरच्या राजकीय क्षेत्रात आपले वेगळे व प्रभावी अस्तित्व ठेवून आहे. संस्थेतील निवडणुकीत आशिर्वाद 5 , सहकार 2 व अपक्ष 1 असे संचालक विजयी झालेत. कार्यकारी मंडळ निवडीच्या घडामोडीत मात्र आशिर्वादचे 3 संचालक प्रदिप अग्रवाल, निरज अग्रवाल, योगेश मुंदडा, सहकारचे 2 संचालक जितेंद्र जैन, डॉ.संदेश गुजराथी असे 5 सदस्य एकत्र होत सहलीला रवाना झाल्याचे समजते. त्यात आशिर्वादचे जेष्ठ संचालक डॉ.बी.एस.पाटिल, हरी भिका वाणी यांना बाहेर ठेवल्याने मोठी खळबळ माजली आहे. तर अपक्ष कल्याण पाटील हे ही सतेच्या प्रवाहाच्या बाहेर असल्याची चर्चा आहे.

संस्था बळकविण्याचा प्रयत्नामुळे सभासदांमध्ये संभ्रम
या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील महत्वपूर्ण संस्था ताब्यात घेण्याच्या हालचालींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे जातीय भावना पुन्हा जोर धरतील. सभासदांनी सर्वसमावेशक निकाल दिलेला असतांनाही संस्था बळकविण्याचा होणारा प्रयत्न सभासदांना बोचणारा आहे. आर्थिक हितासाठी व भविष्यातील तह हयात ताबा मिळविण्याच्या दृष्टीने या हालचालींमागे उच्चभ्रू व तरबेज जेष्ठ व्यापारी मंडळी असावीत असा कयास लावला जात आहे. राजकीय दृष्ट्या विचार केल्यास नीरज अग्रवाल हे मा.संचालक व माजी आमदार डॉ.बि.एस पाटील यांचे पक्षियदृष्ट्या खंदे समर्थक बजरंग अग्रवाल यांचे पुतणे आहेत. मात्र त्यांनी माजी आमदार डाॅ.बी.एस.पाटील यांना बाजूला ठेवण्याच्या भूमिकेचे समर्थन कसे केले असेल? याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.

नागरीकांमध्ये तर्कवितर्क
भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व इतर असा पक्षिय कुरघोडीचाही हा फटका असू शकतो काय? अशीही चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे कल्याण साहेबराव पाटील व हरी वाणी यांच्या विजयासाठी अथक परिश्रम घेणारे आ.शिरीष चौधरी, डॉ.रविंद्र चौधरी यांचेही जवळचे दोन्ही संचालक सत्तेच्या प्रवाहापासून दूर ठेवण्यात काही राजकारण तर शिजले नाही ना? याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहे. खान्देश शिक्षण मंडळाच्या सत्तेसाठी यापूर्वी जेष्ठ संचालक कोणत्याही थराला गेल्याच्या घटना सर्वश्रुत असतांना यावेळी कनिष्ठांनीही तोच आदर्श तीच परंपरा उचलली आहे. सर्व सिनिअर संचालक गावात तर ज्युनिअर बाहेर अशी स्थिती आज दिसत आहे. येणार्‍या काळात या सत्ता स्थापनेचे सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम शहराच्या इतर आर्थिक व शैक्षणिक राजकीय संस्थांच्या राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्‍चित आहे!