आश्रमशाळांच्या बदलाला आंतरराष्ट्रीय नामांकन

0

आश्रमशाळा म्हणजे समस्या, आश्रमशाळा म्हणजे छळ. या आश्रमशाळा म्हणजे भ्रष्टाचाराच्या शाळा अशा अनेक नकारात्मक बिरुदाने नेहमीच चर्चेच्या अग्रभागी असणार्‍या कोकणातल्या आदिवासी विकास विभागाच्या पाच आश्रमशाळांना नुकताच आयएसओ दर्जा मिळाल्याने सरकारी आश्रमशाळा आता भौतिक आणि गुणात्मकदृष्ट्या कात टाकत आहेत. या बदलाला आंतरराष्ट्रीय संस्थेनेसुद्धा मान्यता दिली आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय पेण येथे असून, या प्रकल्प कार्यालयामार्फत 16 आश्रमशाळा चालवल्या जातात. यामधून हजारो आदिवासी मुलेमुली शिक्षण घेताहेत. या सर्व आश्रमशाळा दुर्गम जंगल भागात असून, पिण्याच्या पाण्यापासून, अनेक भौतिक सोईसुविधांची वानवा या शाळांनामधून होती. त्यांच्याविरोधात वेळोवेळी विविध संघटना, संस्था यांनी आंदोलने केली, अभ्यास केला. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा केंद्र आणि राज्य सरकारचे आश्रमशाळांच्या प्रश्‍नांवर कान उपटलेत.

आश्रमशाळांमधील मुलांच्या मृत्यू प्रकरणांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातसुद्धा सुरू असून, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेनेसुद्धा, मुलांच्या मृत्यूची दखल घेत सरकारला जाबही विचारला आहे. अशा सर्व नकारात्मक वातावरणात पेण प्रकल्पातील पाच आश्रमशाळांना, आयएसओ नामांकन मिळणेही खरेतर खूप अभिनंदनीय बाब आहे. आश्रमशाळा कात टाकत आहेत हा संदेश देताना कृतिशील बदलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे, हे नक्की. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील दोन, पनवेल तालुक्यातील एक, कर्जतमधील एक आणि रत्नागिरीतील एक अशा पाच आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांना हा दर्जा प्राप्त झाला आहे. याचे श्रेय, नव्याने रुजू झालेल्या, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांना जाते.खरेतर महाराष्ट्रात सर्वप्रथम नंदुरबार येथील एका आश्रम शाळेस, आयएसओ हे मानांकन मिळाले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील दहा आश्रमशाळांना सात-आठ महिन्यांपूर्वी मिळाले होते आणि आता कोकणातील पाच आश्रमशाळांना हा दर्जा मिळाला आहे. ज्या नंदुरबार शाळेत नामांकन मिळाले त्यावेळी केंद्रे हेच तिथे प्रकल्प अधिकारी होते आणि आता ज्या पाच शाळांना मानांकन मिळाले, तेही त्यांच्या कार्यकाळातील प्रयत्नामुळेच.

विद्यार्थ्यांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्वविकास, शाळेतील वातावरण, खेळ आणि मनोरंजनाची सुविधा, भौतिकसुविधेची उपलब्धता, आरोग्य आणि सकस आहाराची हमी, सामूहिक कार्य आदी बाबींचा समावेश असलेल्या एकूण 48 निकषांवर खर्‍या उतरणार्‍या या आश्रमशाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी, क्रीडांगण, वाचनालय, संगणक प्रशिक्षण, अंघोळीसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, गरम पाण्याची व्यवस्था, जेवणाचा बदललेला दर्जा, तक्रार करण्याच्या सूचना मंडळाच्या उपलब्ध केलेल्या जागा या सर्व बाबी नव्याने सुरू झाल्या. त्यामुळे इथे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्येही वेगळेपणा जाणवत आहे.आदिवासी समाज आणि आदिवासी विकास विभाग यामध्ये तयार झालेली दलालांची साखळी तोडणे हे निर्णय जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर शिक्षण आणि आदिवासी विकासाला गती मिळेल असे वाटते.

-अशोक जंगले,रायगड
9145462580