प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या आवाहनाला प्रतिसाद
फैजपूर : कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी शासनाने संपूर्ण लॉकडाऊन केले असून शहरात असलेल्या गरीब, निराधार, निराश्रीत व दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या जनतेचे अन्नाअभावी हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर फैजपूर प्रांतधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांनी सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर यावल व रावेर तालुक्यातील डॉक्टरांच्या आश्रय फाऊडेशनने
शहरातील सुमारे 60 लोकांच्या रोजच्या जेवणाची जबाबदारी गेल्या तीन दिवसांपासून घेतली आहे. पंधरा दिवसांसाठी ही अन्नदान सेवा सकाळ-संध्याकाळ अविरतपणे चालू राहील, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले. या लोकांनी अन्नासाठी शहरात विनाकारण फिरु नये व एकाच ठिकाणी राहून शासनाच्या लॉकडाऊनचे त्यांच्याकडूनही पालन व्हावे, असे डॉ.फेगडे यांनी सांगितले.
यांचे लाभतेय सहकार्य
शनिवारी सकाळी डॉ.कुंदन फेगडे, डॉ.पराग पाटील, डॉ.विलास पाटील, डॉ.प्रशांत जावळे यांनी या गरजूंकडे प्रत्यक्ष जाऊन जेवण वाटप केले.
फाऊंडेशनला सहकार्य करण्यास कल्पेश खत्री, पप्पू जाधव, उमेश वायकोळे, कन्हैय्या चौधरी, पंकज जयकर, मनीष माहूरकर, आशिष गुजराथी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
सहकार्य करण्यासाठी संपर्काचे आवाहन
या उदात्त कामात कुणाला अथवा कुठल्या स्वयंसेवी संस्थेला स्वेच्छेने एका दिवसासाठी अन्नदान करायचे असल्यास किंवा अजून नवीन निराधारांची जबाबदारी घ्यायची असल्यास एक दिवस आधी डॉ.भरत महाजन 9822838188 किंवा ल्पेश खत्री 9371846888 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.