आश्वसनांची पूर्तता होण्यासाठी समिती गठीत करावी: मिलिंद देवरा

0

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ५० दिवस झाले आहेत. निवडणूक काळात पक्षाने दिलेल्या आश्वसनाची पूर्तता न झाल्याने कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी दिलेल्या आश्वासननाची पूर्तता होण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी केली आहे. तसेच पुढे आपल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वप्रथम आपले आभार मानतो कारण काँग्रेसशासित राज्यांमध्ये पक्षाने लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सरकारला लोकांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार पुढे नेण्यासाठी मदत होईल.

मात्र गेल्या ५० दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांचे अजेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. राज्यातील जनता सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आहे. याचवेळी मार्च २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मुंबईत केलेल्या भाषणात गरिबांना ५०० स्क्वेअर फूट घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं. किमान समान कार्यक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही समिती गठीत करावी अशी मागणी पत्राद्वारे सोनिया गांधी यांना करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सत्तेत आलं आहे. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एका भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे सरकार संविधानाच्या चौकटीत काम करेल असं सोनिया गांधी यांनी लिहून घेण्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी हे मान्य केलं. पण आम्ही काहीही लिहून दिलं नाही असा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला.