जळगाव । शहरातील बहिणाबाई उद्यान, सागर पार्क व डी.एस.पी.चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप येथील हॉकर्सच्या मागण्यांसाठी जळगाव शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेतर्फे शुक्रवार पासून मनपाच्या प्रशासकिय इमारतीबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. शनिवारी दुसर्या दिवशी मनपा प्रशासनाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी संघटनेचे अध्यक्ष सुनील सोनार यांना लिंबू सरबत पाजून हे आंदोलन सोडले.
उपआयुक्तांची आंदोलनस्थळी भेट
आंदोलनादरम्यान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी डफडे वाजवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. दुसजया दिवशी शनिवारी सकाळी गांधीटोपी परिधान करून आंदोलनकर्त्यांनी थाळी नाद व टाळ वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, सामाजिक कार्यकर्ते विनोद देशमुख यांनी शनिवारी 12 वाजता आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. उपायुक्त कहार यांनी हॉकर्सच्या मागण्यांचा प्रस्ताव तयार करण्यात येवून मंजुरीसाठी प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. प्रशासन तुमच्या सोबत आहे, विरोधात नाही, असे आश्वासन दिले असता आंदोलन मागे घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुनील सोनार यांनी सांगितले.
यांचा होता आंदोलनात सहभाग
हॉकर्सच्या मागण्यांसाठी जळगाव शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात अध्यक्ष सुनील सोनार, सुनील जाधव, मोहन तिवारी, दिनेश हिंगणे, राजेंद्र चौधरी, संजय खर्चे, मांगीलाल प्रजावत, शंकर चौधरी, रवि मराठे, राजेंद्र पाटील, सागर भावसार, पंकज चोपडे, विनोद पाटील, रविंद्र बोरसे, रविकांत मराठे यांच्यासह हॉकर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या
मुळ जागेवर व्यवसाय करू देण्यात यावा, ओळख पत्रांचे वाटप करावे, हॉकर्स झोन आखून द्यावे, टाईम झोन निश्चित करावे, अतिक्रमण लाईसन्स लागू करण्यात यावे, राष्टीय फेरीवाला धोरण लागू करण्यात यावे तसेच व्यवसायाला संरक्षण मिळावे आदि मागण्यांसाठी शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.