आश्‍चर्यम्ः आपले दोन्ही पंतप्रधान सुटीवर गेलेच नाहीत

0

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधआन नरेंद्र मोदी रोजच कामात व्यग्र असतात. देशात आणि परदेशात नुसती पायाला भिंगरी लावल्यागत ते फिरत असतात. त्यांचा कायम दावा असतो की, मी आजवर एकही सुट्टी न घेता काम केले आहे. ही बाब निश्चितच खरी आहे. मोदीभक्तही कायम हे उदाहरण देतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आदर्श घ्या, ते एकही सुट्टी न घेता काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे कौतुक जागतिक स्तरावर झाले आहे. मग अशात हा प्रश्न पडतो की त्यांच्याआधी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात किती दिवस सुट्टी घेतली? तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे ‘एकही नाही’.

माहितीच्या अधिकारात 24 तास ऑन ड्युटीच असल्याचे उघड
उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल पण खरे आहे ते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही. ही माहिती खुद्द मोदी सरकारने माहितीच्या अधिकारात दिली आहे. मनोज कुमार यादव या व्यक्तीने मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातल्या सुट्ट्यांसंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्याचे उत्तर 10 फेब्रुवारी 2017 ला मनोजकुमार यादव यांना दिले आहे. या उत्तरात मनमोहन सिंग यांनी एकही सुट्टी घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर देशाचे पंतप्रधान हे कधीच सुट्टी घेत नसतात. ते 24 तास ऑन ड्युटीच असतात. पंतप्रधान फिरत असोत, टेरा कोटामध्ये मूर्ती बघत असोत, देशाबाहेर जगात कुठल्याही देशाच्या दौर्‍यावर गेले असोत, चीनच्या पंतप्रधानांसोबत झोका घेत असोत किंवा अगदी वाघांचे फोटो घेत असोत ते कायम ड्युटीवरच असतात.

राज्यघटनेत सुट्टीबाबत तरतूदच नाही
भारतीय राज्यघटनेत पंतप्रधानांच्या सुट्टीबाबत कोणतीही तरतूदच नाही. एखाद्या गोष्टीचे टायमिंग कसे साधायचे याची अचूक जाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे याची उदाहरणे आजवर देशाने पाहिली आहेत. तर मनमोहन सिंग यांच्या शांत स्वभाववर आजवर अनेकदा टीकाही झाली आहे. मात्र सुट्टीच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार केलेली वक्तव्ये भन्नाट आहेत. त्याऊलट शांतपणे काम करणारे मनमोहन सिंग मात्र आपल्या सुट्टी न घेण्याचे भांडवल करण्यात अपयशी ठरले आहेत असेच म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे असले तरीही मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून देशाला दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांचा कार्यकाळ देश लक्षात ठेवणार आहे.