आश्‍चर्यम ! भुसावळ तहसीलमधील लांबवलेले डंपर ‘जागेवर’

0

वाळू माफियांची प्रशासनाशी अशीठी साठगाठ : ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह

भुसावळ- अवैधरीत्या गौण खनिज करणारे पाच डंपर भुसावळातील महसूल प्रशासनाने शुक्रवारी जप्त केले होते तर वाळू माफियांनी तहसील कार्यालयातूनच पाच डंपर लांबवण्याचा धाडसी प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. या प्रकाराने महसूल प्रशासनावर चारही बाजूकडील टिकेची झोड उठली होती. विशेष म्हणजे ज्या भागात रावेर लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणलेले ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे त्या भागात तैनात पोलिस बंदोबस्ताची नजर चुकवून वाळू माफियांनी डंपर लांबवल्याने ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्‍चचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, हा प्रकार म्हणजे वाळू माफिया व महसूल प्रशासनाची उघड साठ-गाठ असल्याचा आरोप सुज्ञ शहरवासी आता करीत आहेत. जिल्हाधिकार्‍यांना या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, अशी अपेक्षा सुज्ञ शहरवासी व्यक्त करीत आहेत.

महसूल प्रशासनाच्या इभ्रतीचे वाभाडे
भुसावळचे तलाठी एन.आर. ठाकूर व सहकार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना गौणखनिज वाहतूक करणार डंपर (एम.एच.19 – झेड.9091), (जी.जे.21 -व्ही.4872), (एम.एच.19 – सी.वाय.1958), (एम.पी.47 – एच.0146), (एम.एच.19 – झेड.2403) जप्त करून ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली होती मात्र ही शनिवारी दुपारी ही वाहने चोरीस गेली. विशेष म्हणजे तहसीलच्या आवारातील गोदामात ईव्हीएम ठेवल्याने कार्यालयाला 24 तास पोलिस छावणीचे स्वरुप असते. तरीही तस्करांनी मोहीम फक्त केल्याने महसूलच्या इभ्रतीचे पुरते वाभाडे निघाले. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

वाहने जागेवर, प्रत्येकी अडीच लाख दंड -तहसीलदार
शनिवारी तहसील कार्यालयाच्या आवारातून डंपर चालकांनी नेले होते मात्र रविवारी हे डंपर जागेवर आणण्यात आले असून संबंधिताना प्रत्येकी दोन लाख 42 हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गुन्हा दाखल होणारच -प्रांताधिकारी
तहसील कार्यायलाच्या आवारातून वाहने चोरून नेण्याची बाब गंभीर आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपण दिले आहेत. अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला नाही तर आपण स्वतः फिर्यादी होवून गुन्हा दाखल करू, असे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी सांगितले.