पिंपरी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामठे यांची फोनवरीन चर्चा चंद्रकांत पाटील यांच्याशी करून देऊन उपोषण सोडवले. पिंपळे निलख वाकड प्रभागातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ पिंपरी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर बेमुदत उपोषण सुरू होते. यावेळी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती विलास मडेगिरी, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शितल शिंदे, मयुर कलाटे, बाबू नायर आदी उपस्थित होते. वाकड, पिंपळेनिलख, विशालनगर परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी रहिवाश्यांसह सोमवारी महापालिकेच्या समोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.
सचिन पटवर्धन म्हणाले की, भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पाणी टंचाईच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले होते. या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री चंद्रकात पाटील यांचे तुषार कामठे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. त्यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरबत पिण्यास देऊन कामठे यांनी उपोषण मागे घेतले. पालकमंत्र्यांनी 7 दिवसांत या भागातील पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन कामठे यांना दिले आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा केली आहे. विषय गंभीर असल्यामुळेच स्थानिक नगरसेवक, रहिवाशी उपोषणाला बसले होते. टँकर लॉबीसाठी जर कोणी पाणीटंचाई निर्माण करत असेल तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. 7 दिवसांत वाकड, पिंपळे निलख प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल.