‘आषाढघन’ कविसंमेलनात रसिक झाले चिंब!

0

महाकवी कालिदासदिनानिमित्त केले आयोजन

चिंचवडः कविंचे कविपण हे वयाशी संबंधित नसते. अंकुरणारे गवताचे पाते हेफक्त कविंनाच दिसते. पावसाने कविंच्या मनावर अनेक भावभावनांचे रंगलेपन होत असते. पावसामुळे कविंना प्रेमाची प्रेरणा मिळत असली तरी पाऊस असो वा नसो कवी मनातून चिंब भिजलेला असतो! असे मत ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम् येथे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अर्थात महाकवी कालिदासदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड साहित्य परिषद शाखा समरसता साहित्य परिषद आयोजित ‘आषाढघन’ या कविसंमेलनात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण महामंडळ माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्षा शोभा जोशी,उपाध्यक्ष कैलास भैरट, अभय पोकर्णा, मीना पोकर्णा, नितीन हिरवे आदी साहित्यिक उपस्थित होते.

पंचविस कवींनी सादर केल्या कविता
‘जुन्या सरींनी पुन्हा नव्याने सजून आलाय पावसाळा, मला छळाया नवी तयारी करून आलाय पावसाळा!, जिथे हवा तो तिथे न पडता जिथे नको तो तिथे बरसतो, जरूर सद्सदविवेकबुद्धी विकून आलाय पावसाळा’ संदीप जाधव यांच्या या आशयघन गझलेसह गीत, कविता, अभंग, मुक्तछंद अशा विविध आकृतिबंधांनी सुमारे पंचवीस कवींनी ‘आषाढघन’ या काव्यमैफलीत पावसाची विविध रूपे उलगडून दाखवली. दिनेश भोसले, वर्षा बालगोपाल, आय.के.शेख, सविता इंगळे, रघुनाथ पाटील, नेहा चौधरी, सुभाष चव्हाण, कविता तळेकर यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. अनुष्का चिटणीस या बालकवयित्रीला आणि नंदकुमार मुरडे यांच्या ललित अभिवाचनाला श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. कविसंमेलनापूर्वी अनुभूती प्रस्तुत ‘आली कविता भेटायला’ या शीर्षकांतर्गत हेमंत राजाराम, जान्हवी शिराळकर, आनंद पेंढारकर आणि मानसी चिटणीस यांन कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचा निवेदनात चपखल वापर करीत स्वरचित कवितांचे अभिवाचन केले.

ज्वलंत विषयांवर कविता
‘ओठांवर उमलतात ओलसर ओळी काही, खरंच सांगतो मी कविता वगैरे लिहीत नाही’ आनंद पेंढारकर यांच्या या कवितेने रसिकांची मने जिंकली. ‘चल ना कविते दूर दूर जाऊ या, चल जगण्याच्या अजून जवळ येऊ या’ असं काव्यात्मक आवाहन करीत हेमंत राजाराम यांनी रसिकांशी जवळीक साधली. ‘कविते इतकं खरं बोलायचं नसतं कधी’ या मुक्तछंदातील काव्यरचनेने जान्हवी शिराळकर यांनी प्रखर वास्तवाची जाणीव करून दिली. मानसी चिटणीस यांनी, ‘भाजी आणि कुकरच्या चौकटीत अडकली असताना ती येते’ या शब्दांत कवितेची सृजनप्रक्रिया मांडली. पवना नदीच्या काठावर, समरसता पुनरुत्थान गुरुकुलम् च्या आश्रमात गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा यांचा आस्वाद घेत रसिक कवितांच्या पावसात चिंब भिजले. प्रेम, निसर्ग, स्त्रीजाणिवा याबरोबरच स्त्रीभ्रूणहत्येसारख्या ज्वलंत विषयांवरील कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले. पवना नदीच्या काठावर, समरसता पुनरुत्थान गुरुकुलम् च्या आश्रमात गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा यांचा आस्वाद घेत रसिक कवितांच्या पावसात चिंब भिजले. प्रेम, निसर्ग, स्त्रीजाणिवा याबरोबरच स्त्रीभ्रूणहत्येसारख्या ज्वलंत विषयांवरील कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले.

पंजाबराव मोंढे, बाळासाहेब सुबंध, रामचंद्र प्रधान, प्रदीप गांधलीकर, रीदिमा सुर्वे यांनी संयोजनात सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास घुमरे यांनी केले. उज्ज्वला केळकर आणि समृद्धी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले.