जळगाव । शहरातील विविध शाळांतर्फे सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही शाळांतर्फे दिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम अशा विविध वेषभूषा साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांनी साकारलेली वेशभुषा लक्षवेधी ठरत होती.
बी.यु.एन.रायसोनी शाळेत आषाढी साजरी
येथील बी.यु.एन.रायसोनी मराठी शिशुविहार, प्राथमिक, माध्यमिक विभाग शाळेत पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव. हा सांस्कृतीक वारसा जपण्यासाठी दि.3 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते विठूरायाचे पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ झाला. बी.यु.एन.रायसोनी मराठी शाळेतील चिमुकल्यांच्या रूपात अयोध्या नगरात अवघा संतांचा मेळा अवतरला. खांद्यावर दिंडी, दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल-रूक्मिणी, त्यांच्या मागे विठुनामाचा गजर करणारे बालवारकरी असा नयनरम्य बालदिंडी सोहळा याठिकाणी अनुभवयास मिळाला. शाळेच्या प्रांगणासह संपूर्ण शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील वातावरण अवघे विठ्ठलमय झाले होते. हा सोहळा मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापीका श्रीमती रेखा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अभंग गायन स्पर्धा
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव येथे सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील आणि प्राथमिक विभागाच्या समन्वियिका रत्नमाला पाटील उपस्थित होते. यावेळी दीपश्री कोळी यांनी आषाढी एकादशीची माहिती दिली तर यानिमित्ताने घेण्यात झालेल्या अभंग, गायन, स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परीक्षक म्हणून मयूर पाटील आणि दिपाली बडगुजर होते.
अत्रे विद्यालयात एकादशीनिमित्त दिंडी
शिक्षण प्रसारक मंडळ कै. अ.वा.अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल सौ. ज.प्र. कुलकर्णी प्राथमिक विद्या मंदिर यांच्या विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आली. दोन्ही शाळेतील 1000 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे पद्मजा अत्रे, रेवती शेंदुणीकर, सौ. देशकर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणापासून विठ्ठल नामाच्या जयघोषात आपल्या दिंडी यात्रेस प्रारंभ करीत गंधर्व कॉलनीतील विठ्ठल मंदिरात दिंडी झाली. यावेळी कॉलनीस्थित विठ्ठल मंदिराचा संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला.