आषाढी एकादशी : ना पालखी सोहळा, ना वैष्णवांचा मेळा, चंद्रभागेचा काठही सुनाच

पंढरपूर : आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे. आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाकडून काढण्यात येणारी पायी वारी याला एक मोठी परंपरा आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून वारकऱ्यांना पायी वारी करता येत नाही आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे भाविक येत असतात परंतु गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे आज आषाढी एकादशीला सुद्धा मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढीवारी प्रतिकात्मक स्वरुपात होत असल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात तुरळक वारकऱ्यांनी हजेरी लावली आहे.

दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात आणि चंद्रभागेच स्नान करून भजन-किर्तन करतात. करोना मुळे सुरवातीला चैत्री त्यानंतर आषाढी, कार्तिकी, माघी आणि या नवीन वर्षांतील चैत्र आणि आता आषाढी अशा सहा वारींवर करोनाचे संकट होते. त्यामुळे देवाचे दर्शन आणि पायी वारी लाखो भाविकांची होऊ शकली नाही. गेल्या आषाढी वारीला केवळ दोन दिवस परवानगी दिली होती, मात्र यंदा नवमी ते पौर्णिमा म्हणजेच आजपासून २४ जुलैपर्यंत मानाच्या दहा पालख्या पंढरीत मुक्कामी राहणार आहेत. यंदाही प्रशासनाने वारीची प्रथा आणि परंपरा कायम ठेवत आरोग्य आणि इतर सुविधेवर भर दिला आहे. पंढरपुरात २५ जुलै पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी दर्शनाला बंद आहे.

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सपत्नीक विठ्ठलाची पूजा

आषाढी एकादशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. त्यावेळी, आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात केली.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीत ट्विट

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच प्रादेशिक अस्मिता जपतात. देशातील नागरिकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात आपुलकीने आपलसं करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी आणि वारकऱ्यांची शिकवण मोदींनी जगाला सांगितली आहे.