आषाढी एकादशी पर्वावर भाविकांची अलोट गर्दी

0

मुक्ताईनगर । तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील संत मुक्ताई देवस्थान येथे आषाढ वद्य एकादशीच्या पर्वावर हजारो भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेला जाणारे भाविक तेथून परतल्यावर श्रीक्षेत्र मेहूण येथील संत मुक्ताईंचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरेनुसार 20 रोजी अगदी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली.

किर्तनाचा कार्यक्रम
संत मुक्ताईंचे दर्शन घेण्यासाठी सकाळी 6 वाजेपासून दर्शनासाठी रांग लागली होती. मुक्ताईंच्या जयघोषात मेहूण तापीतीर दुमदुमले होते. सकाळी 11 वाजता सुधाकर महाराज मेहूणकर यांचे कीर्तन पार पडले. आषाढ शुद्ध एकादशीच्या श्रीक्षेत्र येथील सोहळ्याला वारकरी संप्रदायात जसे अतिशय महत्वाचे स्थान आहे तसेच आषाढ वद्य एकादशीच्या श्रीक्षेत्र मेहूण येथील सोहळ्याचे स्थान आहे. या मुहूर्तावर हजारो भाविकांनी पहाटेपासून तापीतीरी गर्दी केली होती. सावदा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरापर्यंत तापीतीर परिसर मुक्ताई भक्तांनी फुलला होता.