आषाढी यात्रेसाठी 3,678 जादा एसटी बसेस

0

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रवाशी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी दरवर्षी प्रमाणे ४ जुलै (मंगळवार) रोजी पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटीने तब्बल ३६८७ जादा बसेस सोडल्या असून भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रुप बुकिंग, अडव्हान्स बुकिंग तसेच प्रत्यक्ष बसस्थानकावर करंट बुकिंगची सुविधा प्राप्त करून दिली आहे.

लाखो भाविकांची मांदियाळी:-
प्रवाशांची विशेष काळजी या निमित्ताने घेतली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. त्यापैकी बहुतांश येताना पायी दिंडीने येतात पण आषाढी यात्रा झाली कि, व्दादशीला म्हणजे ५ तारखेला अनेक भाविक परतीच्या प्रवासासाठी एसटी बसने निघतात. त्यांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे मुख्य बसस्थानकातून काही अंतरावर तात्पुरते स्थानक उभारून तेथून या जादा बसेस विभाग निहाय सोडण्यात येणार आहेत.

सर्व सुविधांची पूर्तता करण्याचा प्रयत्न:-
नव्या स्थानकात भाविक-प्रवाशांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहे, उपाहारगृहे, विश्रांती कक्ष, झुणका-भाकर केंद्र, अखंडित वीज पुरवठा, स्वच्छ पाणी या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नवीन बसस्थानकातून मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात विभाग निहाय फलाट निर्माण करण्यात आले असून भाविक प्रवाशांनी परतीच्या प्रवासासाठी येथून मार्गस्थ व्हावे. तरी भाविक प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी केले आहे.