संजय धोंडगे यांच्यासह भैय्यासाहेब पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुक्ताईनगर- राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणार्या पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष हभप संजय नाना धोंडगे यांच्यासह भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी केली आहे.
राज्यातील पालखी सोहळ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
यंदा आषाढी वारी 12 जुलै रोजी आहे. या आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा 8 जून रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून, संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा 9 जून रोजी श्री क्षेत्र शेगावहून, संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा 16 जून रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 24 जुन रोजी श्री क्षेत्र देहूहुन, संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा 24 जून रोजी श्री क्षेत्र पैठणहून, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 25 जुन रोजी श्री क्षेत्र आळंदीहून तर संत सोपानकाकांचा पालखी सोहळा 30 जुन रोजी श्री क्षेत्र सासवडहून प्रस्थान करणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक पुण्यातील विधानभवनात होते तर राज्यातील इतर पालखी सोहळ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते. पंढरपूर येथे आषाढी वारीच्या पूर्वी सोलापुरचे पालकमंत्री बैठक घेतात परंतु त्यामध्ये राज्यातील पालखी सोहळ्यांच्या नियोजनापेक्षा स्थानिक प्रश्नाकडेच अधिक लक्ष दिले जाते त्यामुळे राज्यातील पालखी सोहळ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होते. संत मुक्ताबाई व संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा जळगाव, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातुन येतो. या पालखी सोहळ्याचा प्रवास सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक असतो. या सोहळ्या बरोबर सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक वारकरी असतात. संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा नाशिक, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातुन येतो. या पालखी सोहळ्या बरोबर सुमारे एक लाख वारकरी असतात तर संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातुन प्रवास करतो. या पालखी सोहळ्या बरोबर सुमारे 50 हजार वारकरी असतात. आषाढी वारीसाठी येणा-या पालखी सोहळ्यांसमोर वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षा, गॅस, रॉकेल व पंढरपूर येथे आल्यानंतर मिळणारे तुटपुंजे दर्शन पास या सर्व अडचणी असतात. या अडचणीकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सीमेवर प्रशासन सज्ज असते. सर्व सुविधा शासन पुरविते मग इतर संतांच्या बाबतीतच असा दुजाभाव का? या सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांनाही मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
इतर पालखी सोहळ्यांनाही मिळाव्यात सुविधा
दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारक-यांची संख्या वाढु लागली आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढु लागला आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षीत समाजही सोहळ्यात येवु लागला आहे त्यामुळे मुक्कामाच्या जागाही कमी पडु लागल्या आहेत. संत ज्ञानदेव, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात तशा सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांना मिळाव्यात यासाठी राज्यातील पालखी मार्गावरील जिल्हा प्रशासनाची व पालखी सोहळा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील व हभप संजय महाराज धोंडगे यांनी केली आहे.