तब्बल 70 वर्षांपूर्वीची घटना. प्रवाशांना घेऊन निघलेली एस.एस. रामदास बोट रेवसजवळ बुडाली आणि साडेतीनशे प्रवाशांना जलसमाधी मिळाली. आपल्याकडे टायटॅनिकला मिळालेल्या जलसमाधीच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढल्या जातात. परंतु, रामदासच्या उत्खननाचा मात्र आजवर कधीच प्रयत्न झालेला नाही… दामले त्यांच्या बहिणीकडे अलिबागला निघाले होते. संध्याकाळी आम्ही मुले शाळा संपवून घरी परत आलो, तेव्हा दामल्यांच्या घरात आनंदी वातावरण होते. आमच्या बालमनाला उमजेना, काय झालंय? काही वेळातच रेडिओवरून घोषित करण्यात आले की, अलिबागकडे जाणारी बोट बुडाली. प्रवासी वाचण्याची शक्यता कमी. दामल्यांच्या घरातील आनंदाचे कारण कळले.
दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रांत पहिल्या पानावर ठळक बातमी- रामदास ही आलिशान बोट वादळात सापडून मुंबईपासून वीस सागरी मैलावर बुडाली. एस. एस. रामदास ही खरेतर कोकण किनार्यावर प्रवासी आणि सामान वाहतूक करणारी आरामदायी मोठ्ठी बोट. तीन मजल्यांवरच्या चार वर्गांमधून साडेसहाशे प्रवासी घेऊन जाणारी. सिंदीया स्टीमशिप कंपनीची उपकंपनी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन (बीएसएन)-ला मुंबईपासून गोव्यापर्यंत कोकणच्या डझनभर बंदरांकडे प्रवाशांची वाहतूक करण्याची मक्तेदारी असलेली कंपनी. आठ महिने कोकणी बंदरांकडे प्रवास करून थकलेली रामदास बोट त्यावर्षी मुंबई-रेवस हा प्रवास दिवसातून एकदा करत असे आणि मान्सूनमधील वादळ असो, मुसळदार पाऊस असो, प्रवासी निर्धास्तपणे यातून प्रवास करत असत, कारण तिचा अवाढव्य आकार. त्या दिवशी होती आषाढी अमावस्या. त्या दिवशीही सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू होती. भाऊच्या धक्क्यावर रामदास बोट प्रवासाला सज्ज झाली होती. एव्हान तुफान वादळाचीही चाहूल लागली होती. बीएसएन कंपनीचे एक अधिकारी थत्ते यांनाही समुद्रावरील वादळ भयकारी वाटले. थत्तेंना बोट सोडणे, न सोडणेचा अधिकार बहुधा नसावा. एव्हाना दोनअडीचशे प्रवासी बोटीवर चढले होते. बोटीचा कॅप्टन मुल्ला, आभाळाकडे पाहत धक्क्यावर उभा होता. आज न्यावी का बोट, रेवसकडे? कॅप्टन अशा द्विधा मनःस्थितीत होता. सराईत प्रवासी घरी जाण्यास अधीर झाले होते. अखेर सकाळी साडेदहाला बोटीने नांगर उचलला आणि ती रेवसकडे दीड तासांच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पण काही वेळातच डोलू लागली. तासाभरात बोट काशाच्या खडकाजवळ आली. डाव्या बाजूने तो ओलांडला की दहा मिनिटांत रेवस. अमावास्येची उधाणाची भरती सुरू झाली होती. सहा-सात फूट उंचीच्या लाटांचे तडाखे बोटीवर आदळू लागले. कॅप्टनने बोट मुंबईला परत नेण्यासाठी उलटी फिरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळेस आदळलेल्या एका महाकाय लाटेने बोट उलटीपालटी केली. बोटीवर हाहाकार उडाला. प्रवाशांना लाईफ जाकीटही घेण्याचीही सवड न देता ती प्रचंड आकाराची रामदास उसळलेल्या सागराने गिळंकृत केली.
या घटनेनंतर पावसाळ्यातील जून ते ऑगस्ट या वादळी मोसमात तेथील जलवाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरच नाही, तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर इतका दारुण अपघात कधीही झाला नाही. रामदास बोटीचे अवशेषही शोधून काढण्याचा प्रयत्न झाला नाही.
अमुलकुमार जैन – बोर्ली-मांडला