शहापूर । पहिले लोकल सोडा, नाही पहिले मेल सोडा, असे म्हणत आज सकाळी मुंबईकडे जाणार्या लोकल व मेल या दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून रेलरोको केल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला. अखेर रेल्वे पोलिसांनी व स्टेशन मास्तरांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रथम लोकल सोडण्यात आली. व त्यानंतर मेल सोडण्यात आली व तिढा सुटला. मात्र, कोणाची गाडी पहिले जाणार लोकल की मेल यामध्ये चक्क अर्धातास वाया गेला. सततच्या तांत्रिक बिघाडाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. त्यात भरीस भर म्हणजे लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी लोकल खोळंबून ठेवल्या जात असल्यामुळे प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडत आहे. आज सकाळी आसनगाव स्थानकातही याचाच उद्रेक पहावयास मिळाला. दररोज सकाळी चाकरमानी प्रवाशांना ऑफिस गाठण्याची धावपळ असते. अश्या वेळी आज सकाळी 8:30 च्या आसनगाव- मुंबई लोकलमध्ये चाकरमानी लोकल सुटण्याची वाट बघत होते. त्याचवेळी मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस लूप लाइनवर घेण्यात आली असता लोकलमधील प्रवाशांना वाटले एक्सप्रेस पुढे काढत आहेत. यामुळे ऑफिस गाठायला उशीर होणार असे वाटल्याने लोकलमधील प्रवासी ट्रॅकवर उतरले. पहिले लोकल सोडायची मागणी केली.
लोकलमधील प्रवाशांचा हट्टीपणा पाहून राज्यराणी एक्सप्रेसमधील प्रवाशांनीदेखील ट्रॅकवर उतरून पहिले एक्सप्रेस सोडायची मागणी केली. दोन्ही प्रवाशांच्या या हेकेखोर पणामुळे दोन्ही गाड्यांना चक्क अर्धातास उशीर झाला. प्रवाशांचा हा तिढा सोडवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी व स्टेशन मास्तरांनी मध्यस्थी केली. या यशस्वी मध्यस्थी नंतर प्रथम लोकल सोडण्यात आली व नंतर राज्यराणी एक्सप्रेस सोडण्यात आली. त्यातच विशेषत: कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. तांत्रिक बिघाड दूर करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांमधून वारंवार होत आहे, तर या मार्गावरील बिघाडांचे सत्र थांबवून लोकसेवा कधी सुरळीत होणार, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.