आसाममधील ‘ते’ एन्काउंटरच बनावट

0

नवी दिल्ली । आसाममध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे 10 मार्च रोजी एन्काउंटर केले होते. मात्र, सीआरपीएफचे ईशान्य भारताचे महानिरीक्षक रजनीश रॉय यांनी सादर केलेल्या एका अहवालामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. दिल्लीतील सीआरपीएफच्या मुख्यालयाला सादर केलेल्या अहवालात 10 मार्च रोजी आसाममधील चिरंगमध्ये लष्कर, आसाम पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दलाने संयुक्तपणे केलेले एन्काऊंटर बनावट असल्याचे रॉय यांनी म्हटले आहे. या एन्काउंटरची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही रॉय यांनी केली आहे.

सीआरपीएफच्या मुख्यालयाला दिलेल्या अहवालात रजनीश रॉय यांनी 10 मार्च रोजी करण्यात आलेल्या एन्काउंटरबद्दलची माहिती दिली आहे. हे ‘एन्काउंटर करताना दोन लोकांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहांजवळ शस्त्रे ठेवण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता, हे दाखवण्यासाठी हा बनाव रचण्यात आला. या कथित एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या व्यक्तींची नावे लूकस नार्जेरी आणि डेविड इस्लेरी आहेत,’ असे रजनीश रॉय यांनी सांगितले.

रजनीश रॉय यांनी सीआरपीएफच्या मुख्यालयाला दिलेल्या अहवालानुसार, एन्काऊंटर करण्यासाठी दोघांना डी-कलिंग नावाच्या एका गावातील घरातून ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना बनावट एन्काउंटरमध्ये सिमलागुरी गावात मारण्यात आले. लूकस आणि डेविड हे दोघेही नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आणि बोडोलँड संघटनेचे सदस्य असल्याचा दावा करण्यात आला. ‘या एन्काऊंटरचे प्रत्यक्षदर्शी सुरक्षित असून त्यांनीच मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह ओळखले होते,’ असेदेखील रजनीश रॉय यांनी सांगितले. रजनीश रॉय यांनी त्यांच्या अहवालात अनेक धक्कादायक आणि खळबळजनक दावे केले आहेत. ‘जीपीएस रेकॉर्ड्सनुसार सीआरपीएफचे एक पथक एन्काऊंटर करण्याच्या काही तासांआधीच घटनास्थळी येऊन गेले. एन्काऊंटर करण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी सीआरपीएफचे पथक घटनास्थळी गेले होते,’ अशी माहिती रॉय यांनी सीआरपीएफ मुख्यालयाला देण्यात आलेल्या अहवालात नमूद केली आहे.