अल्पवयीन मुलीवर स्वत:च्याच आश्रमात बलात्कार करणारा 77 वर्षीय भोंदूबाबा आसाराम यास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावली. या खटल्यात अन्य दोघांनाही शिक्षा सुनावली असून, त्यामध्ये एक महिलादेखील आहे. विशेष म्हणजे आसारामला शिक्षा होऊ नये साठी त्याचे हजारो भक्त देवाची प्रार्थना करत होते. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या भोंदूसाठी भारतात प्रार्थना केली जाते, हा बलात्कारापेक्षा गंभीर गुन्हा वाटतो. या लोकांच्या मानसिकतेविषयी अनेक शंका निर्माण होतात. आसारामविरुद्ध सबळ पुरावे असताना त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्याऐवजी भारतासारख्या सुसंस्कृत देशात त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना केली जाते हे दुर्दैवच. आसुमल हरपलानी उर्फ आसाराम बापू याने सुरुवातीस गुजरातमधील मणिपूर येथे चहा विकला, दारू विकली आणि टांगाही चालवला. परंतु, मनासारखे काही हाती न लागल्याने अतिशय सोपा असा बुवाबाजीचा मार्ग त्याने पत्करला. हाच बदमाश माणूस पुढे हजारो भक्तांसाठी पूजनीय ठरला.
देेशात नव्हे तर जगभरात आपल्या आदरणीय पंतप्रधानांचे कौतुक होते ते त्यांनी लहानपणी विकलेल्या चहाचे. एक चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो याबद्दल संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो. पण, एक लक्षात घ्यायला हवे की येथे चहा विकणे महत्त्वाचे नाही. महत्त्वाची आहे ती तुमची मानसिकता आणि विचार. कुठलाही छोटा-मोठा व्यवसाय प्रामाणिकपणे करणारा आणि सत्याची कास धरत मार्गक्रमण करणारा माणूस या देशात निश्चित मोठा होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले पंतप्रधान होय. मात्र, आसारामचे उदाहरण यापेक्षा अगदी उलट आहे. आसारामने चहा विकला. पण, त्यात मनासारखा पैसा मिळवता आला नाही म्हणून तो दारू विकू लागला. पैसा कमावणे हेच त्याचे उद्दिष्ट्य होते. त्याच्यावर एका युवकाच्या खुनाचा आरोप झाल्यानंतर त्यास तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगातून सुटल्यावर त्याने टांगाही चालवला. आसारामचा मार्ग हा सुरुवातीपासूनच कुमार्ग होता. आध्यात्मिकतेच्या नावाखाली त्याला लूट करायची होती. पोरीबाळींची इज्जत लुटायची होती. म्हणूनच त्याचा मुखवटा एक दिवस गळून पडला.
देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमधील घर सोडून आसारामचे कुटुंब गुजरातमधील मणिनगरमध्ये येऊन स्थिरावले होते. यानंतर याच मणिनगरमध्ये पित्याचा मृत्यू झाल्यानंतर आसारामने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. आजमेरमध्ये लग्न केल्यानंतर आसारामला दोन मुले झाली. यानंतर आसारामने आध्यात्मिक मार्गाकडे वळण्याचा निर्णय घेतला. नैनितालमध्ये लीलाशाह यांना आध्यात्मिक गुरू बनवल्यानंतर आसुमल हरपलानी आसाराम बापू झाला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. लाखो भक्तांना त्याने अक्षरश: मूर्ख बनवले. अनेक सुशिक्षित लोक या भोंदूसाठी वेडे झाले होते. आजही यापैकी अनेकांचे वेड कमी झालेले नाही. अशा बदमाश व्यक्तीसाठी प्रार्थना करणारे किती मूर्ख असू शकतात याचा अंदाजही लावता येणार नाही. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या आसारामसाठी आजही लोक रस्त्यावर येतात, प्रार्थना करतात हे जास्त क्लेशदायक आहे. सध्या तर देशात बलात्कार्यांसाठी तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरण्याची नवीन पद्धत कठुआ प्रकरणापासून सुरू झाली आहे. बलात्कार्याचे समर्थन करणारी ही मानसिकता देशात कधीच नव्हती. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून ही मानसिकता वाढू लागली आहे.
मूळ उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथे राहणारी आणि मध्य प्रदेशातील आसारामच्या छिंदवाडा आश्रमात शिकणार्या अल्पवयीन मुलीवर याच आसारामने बलात्कार केला होता. जोधपूरजवळच्या मनाई भागातील आश्रमात या मुलीला बोलावून आसारामने 15 ऑगस्ट 2013च्या रात्री तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने धाडस दाखवत सर्व विरोध डावलून पोलीस ठाण्यात जाऊन आसारामविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी म्हणजे 1 सप्टेंबर 2013 रोजी आसाराम या बलात्कारी बाबाला इंदूरहून अटक करून जोधपूरला आणण्यात आले. तेव्हापासून तो कारागृहात आहे. बलात्कार आणि खुनाचे अन्य काही गुन्हे आसारामने केल्याचा संशयही तपासयंत्रणांना आहे. पोस्को कायद्यांतर्गत आसारामवर गुन्हा दाखल होता. त्यास न्यायालयाने आता मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. आसारामसारख्या लिंगपिसाट गुन्हेगाराला न्यायालयाने जास्तीत-जास्त शिक्षा देणे अपेक्षित होते. आणि तसेच घडले आहे. वयाचा विचार करता कमी शिक्षा द्यावी अशी याचना या बलात्कार्याने न्यायालयात केली आहे. दुष्कर्म करताना मात्र या भोंदूला स्वत:च्या आणि पीडितेच्या वयाचा विसर पडला होता.
पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी मागील पाच वर्षांत अनेक यातना सहन केल्या आहेत. आसाराम कारागृहात सुरक्षित होता. पण, त्याच्या साथीदारांच्या आणि मूर्ख भक्तांच्या धमक्यांनी पीडितेच्या कुटुंबाचे जगणे हराम केले होते. स्वत:च्याच घरात हे कुटुंब कैद असल्यासारखे राहत आहे. त्यांचा वनवास आसारामच्या शिक्षेनंतर तरी संपणार का, हाच खरा प्रश्न आहे. या पीडित मुलीच्या धैर्याला सलाम केला पाहिजे. खटला सुरू असताना अनेक साक्षीदारांवर हल्ले झाले, खून झाले. परंतु, पीडित मुलीने माघार घेतली नाही. खटला लढण्यासाठी रोजीरोटीचे साधन असलेला ट्रक पीडितेच्या वडिलांना विकावा लागला होता. खटल्यातील एकूण नऊ साक्षीदारांवर हल्ला झाला, तर तीन जणांची हत्या झाली आहे. एवढेच नव्हे तर खटला सुरू असताना आसारामच्या वकिलांनी न्यायालयात पीडितेवर अतिशय खालचे स्तराचे आरोप केले होते. मानसिक आजार असल्याने पीडितेला एकांतात पुरुषांना भेटण्याची इच्छा होते, असा आरोप आसारामच्या वकिलाने केला होता. अशाप्रकारे अनेक अपमानाचे विषारी डोस या पीडितेला पचवावे लागले होते. डेरा प्रमुख गुरमीत राम-रहिमसाठी रस्त्यावर उतरलेले मूर्ख लोक या देशाने पाहिले तसेच बलात्कारी आसारामसाठी प्रार्थना करणारेही आपण पाहिले. आसाराम आणि रामरहिम यांच्या कृत्यांपेक्षा त्यांचे समर्थन करणारे अधिक दोषी आहेत. त्यांनादेखील शिक्षा केली पाहिजे. चहा आणि दारू विकणारा आसाराम पुढे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू होऊन कोट्यवधींची माया कमावतो, हेच या देशाचे दुर्दैव आहे.