नवापूर : आमदार कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली शेतकरी आसूड यात्रा महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील नवापूर येथे गुरुवारी अडवण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार सुद्धा केला. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले.
अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेली शेतकरी आसूड यात्रा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथे जाण्यास निघाली होती. मात्र, महाराष्ट्र-गुजरात सीमेवर ही आसूड यात्रा पोहचताच गुजरात पोलिसांनी सीमेच्या पलिकडून कार्यकर्त्यांना अडवले. यात्रा अडविल्याने आमदार कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही आंदोलनकर्ते पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने झटापटीही झाली. त्यानंतर पोलिसांनी सौैम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना दूर केले. यानंतर आमदार कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार बच्चू कडू यांच्या आसूड यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या सीमेवर पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.