जळगाव प्रतिनिधी । फेसबुकवरील विख्यात कुबेर ग्रुपतर्फे तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनीक विद्यालयात अभ्यास कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
फेसबुकवरील कुबेर ग्रुप हा व्हर्च्युअल ते रिअल या दोन्ही प्रकारांमधील वैविध्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांसाठी ओळखला जातो. संगमनेर येथील संतोष लहामगे या तरूण व्यावसायिकाने समाजसेवेचा उदात्त हेतू ठेवून स्थापन केलेल्या या समूहात समाजाच्या विविध स्तरांमधील मान्यवरांचा समावेश आहे. या समूहातर्फे कुबेर फाऊंडेशनदेखील स्थापन करण्यात आले असून याच्याच अंतर्गत विविधांगी समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनीक विद्यालयात अभ्यास कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात कुबेर समूहाच्या सदस्या संध्या पाटील, लीना जैन आणि संध्या जोशी या समुपदेशकांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संध्या जोशी यांनी चाईल्ड हेल्पलाईनबाबत मार्गदर्शन केले. यानंतर लीना जैन आणि संध्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना जीवनात यशस्वी होण्याच्या टिप्स देण्यात आल्या. विशेष करून आजची पिढी ही स्मार्टफोनच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेलेली आहे. या पार्श्वभूमिवर, मुलांनी याला बळी न पडता हसत-खेळत अभ्यास करून यश कसे संपादन करावे याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये वेळेचे नियोजन, भौतिक परिस्थिती, संतुलीत आहार, नोटस् काढण्याच्या पद्धती व मानसिक व शारिरीक स्वास्थ कसे जपावे यावर मार्गदर्शनपर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्या पाटील, लीना जैन व संध्या जोशी यांना कुबरे समूहाचे प्रमुख संतोष लहामगे, अमेरिकास्थित नितीन नारखेडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर यशस्वीतेसाठी याच विद्यालयात कार्यरत असणार्या कुबेर समूहाच्या सदस्या मंगला नारखेडे, किशोर पाटील, राजेश अग्रवाल आदींनी सहकार्य केले. याच विद्यालयात कुबेर समूहातर्फे अजून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. दरम्यान, कुबेरकरांच्या या अनोख्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी भारावून गेल्याचे दिसून आले.