जळगाव । वाघूर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात भूमि अधिग्रहणासाठी विरोध असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला कालवा व पाटचार्यांचा कामाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. आसोदा व भादलीसह परिसरातील शिवारात आता बंदिस्त कालवा आणि पाटचार्यांच्या मदतीने पाणी पोहचणार असून सुमारे 25 गावांमध्ये जलक्रांती होणार आहे. विशेष म्हणजे या कामांसाठी 237 कोटी रूपयांच्या निवीदांची प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे.
पाच वर्षांपासून प्रलंबीत
आसोदा व भादली शाखेच्या कालव्याच्या वितरण प्रणालीचे काम गत पाच वर्षांपासून भुसंपादनास शेतकर्यांच्या तिव्र विरोधामुळे बंद होते. सदर कामे मार्गी लागण्यासाठी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची पर्यायी उपाया करीता पाच महिन्यांपूर्वी बैठक घेऊन मार्गदर्शन मागविले होते. त्यात कालव्याद्वारे सदरची कामे न करता दाबयुक्त बंदिस्तपाईप लाईनव्दारे वितरण प्रणालीचे काम करण्याचे ठरले. या बाबत पाटबंधारे विभागाने 52 व्या बैठकीत सदर ठराव मंजुर करण्यात आला. यासाठी जसंपदा मंत्री ना. गिरिश महाजन व ना. मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे ना. गुलाबराव पाटील यांनी रेटा लाऊन धरुन ही कामे मार्गी लावली.
या गावांना होणार लाभ
यामुळे भादली शाखेतील नशिराबाद, कडगाव, भादली, शेळगाव, कानसवाडे, भोलाणे, देऊळवाडे, सुजदे, खापरखेडा, धामणगांव, नांद्रा, तुंरखेडा, आवार व डिकसाई अशा 16 गावांना तर आसोदा शाखेतील ममुराबाद, आव्हाणे, फुफनगरी, आसोदा, वडनगरी, खेडी, कानळदा अशा 9 गावांना फायदा होणार आहे. यामुळे या गावांमधील सुमारे 9500 शेतकर्यांची 9969 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असल्याने परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. या बंदिस्तपाईप लाईन प्रणालीमुळे ड्रिप व स्प्रिंकलर पध्दतीने शेतकर्यांना पाणी देणे सुलभ होणार असून ही 237 कोटींची कामे मार्च 2018 पर्यंत पूर्ण होणार आहेत.
प्रणालीचे फायदे
आसोदा व भादली शाखा कालवा व वितरीकेचे काम बंदिस्त पाईपलाईनव्दारे होणार असल्याने कामाच्या खर्चात सुमारे 200 कोटींची बचत होणार आहे. सुपिक व कसदार जमिनीची कायम स्वरुपी बचत होणार असून भुसंपादनाचा लागणारा कालावधी टळला आहे. तर पाण्याची बचत होऊन पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही तसेच सिंचन व्यवस्थापन कमीत कमी कर्मचार्यांच्या सहाय्याने सुरळीतपणे पार पाडणे शक्य होणार आहे. यामुळे या कामाची गती वाढून कमी खर्चात व कमी कालावधीत हर खेत को पाणी या तत्वाला अनुसरुन काम करणे शक्य होणार आहे.