जळगाव : तालुक्यातील आसोदा शिवारातील कला वसंत नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून 11 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना बुधवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
विजय शांताराम पाटील (36, रा.कला वसंत नगर, आसोदा शिवार, जळगाव)हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्या असून खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 15 डिसेंबर सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घराचा बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कूलूप तोडून घरातील तीन हजार 750 रुपयांची रोकड आणि 7 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून 11 हजार 250 रुपयांचा ऐवज लांबवला.या प्रकरणी विजय पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माणिक सपकाळे करीत आहे.