पुणे । जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे यांना 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, नर्हे येथे होणार्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त अॅड. शार्दुल जाधवर, प्रा.अमित गोगावले उपस्थित होते.
सन्मान सोहळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुरस्कार, इन्स्टिटयूट ऑफ सायन्सचे एन.सी.जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुदर्शन न्यूज चॅनलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. कार्यक्रमात संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले उडान भाग 3 या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तिंना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी कार्यक्रमाला जनता दल (यु) चे मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता तसेच राज्यसभेचे माजी खासदार के.सी.त्यागी हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.