पाचोरा। भडगाव तालुक्याला वीज केंद्राची अनेकदा मागणी करुनदेखील काहीही पावले उचलली जात नसल्याने वारंवार पाठपुरावा करूनदेखील वीज उपकेंद्र मंजूर होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार किशोर पाटील यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनातच मुंबई येथे उपोषणाला बसण्याचे जाहीर केले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजेपासून ते विधानसभेसमोर उपोषणाला बसणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तालुकावासियांची जुनी मागणी
भडगाव तालुक्याला स्वतंत्र वीज उपकेंद्र व्हावे ही मागणी आमदार किशोर पाटील यांचेकडून कधीपासूनच करण्यात येत आहे. त्यापुर्वीही शासनाकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वीज उपकेंद्र होण्याबाबत तगादा लावला होता परंतू अद्यापर्यंत काहीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. तालुक्यात 70 गावे असून पाचोरा, चाळीसगाव, पारोळा तालुक्यातील उपकेंद्रांवर अवलंबून रहावे लागते. त्यांचे अंतर जास्त असल्याने वीज गळती होण्याचे प्रमाण अधिक होते. पर्यांयाने कमी दाबाने वीज मिळत असते. भडगाव तालुक्यात 2010 साली सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कोठली शिवारातील 10 एकर जागाही वीज कंपनीने रक्कम भरून ताब्यात घेतली. मात्र प्रत्यक्षात सबस्टेशनच्या कामाला प्रारंभ झालेला नाही. पाठपुरावा केला असूनही कार्यवाही होत नसल्याने आमदार किशोर पाटील उपोषणाला बसत आहेत.