आ.खडसेंना काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर

0
जळगाव । भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी दीपनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य दुसर्‍या पक्षात जाणार का? अशी जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगली आहे.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील सकल लेवा पाटीदार समितीतर्फे स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमात आ. एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आ. खडसे यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, असे जाहीर आवाहन केले. मात्र, आ. खडसे यांनी आपल्या भाषणात डॉ. पाटील यांच्या आवाहनास नकार दिला. परंतु, ‘अन्याय झाला तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्याचा प्रतिकार केला पाहिजे. आपण संख्येने कमी नाही’, असे वक्तव्य केले. त्यांचे हे विधान समाजबांधवांना उद्देशून असले, तरी त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाऊ लागले आहे. यामुळे खडसे भाजपा सोडणार का? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.